उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळला – चेअरमन दंडनाईक यांसह संचालकांच्या अटकेचा मुहूर्त कधी ?
वसंतदादा बँक व अरविंद पतसंस्थेत करोडो रुपयांचा घोटाळा – ठेवीदारांना लुटले तर कर्जदारांना बुडविले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी विजय दंडनाईक हे 28 जुलै रोजी गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल दीड महिना झाले तरी फरार असुन त्यांची पत्नी सुरेखा व मुलगा पृथ्वीराज दंडनाईक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दंडनाईक यांच्यासह 6 संचालक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत नाकारला आहे.
चेअरमन विजय दंडनाईक यांनी अद्याप जामीन अर्ज केला नव्हता मात्र पृथ्वीराज, सुरेखा यासह अन्य 18 आरोपी संचालकांनी धाराशिव सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता मात्र तो जिल्हा व सत्र न्यायाधीश बागे पाटील यांनी फेटाळला त्यानंतर त्यातील 6 जणांनी त्याला उच्च न्यायालयात अपील केले मात्र तिथेही त्यांचा जामीन नाकारला. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्या नंतर पोलिस त्यांना कधी अटक करतात हे पाहावे लागेल.
संचालक असलेले ऍड दयानंद बिराजदार, गणेश दत्ता बंडगर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, रामलिंग करजखेडे, सी ए असलेले भीमराव ताम्हाणे, पृथ्वीराज विजय दंडनाईक, विष्णुदास रामजीवन सारडा,कमलाकर आकोसकर, शुभांगी प्रशांत गांधी, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे, सुरेखा विजय दंडनाईक, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा यावर आता अटकेची टांगती तलवार कायम आहे.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ करीत आहेत.
विजय दंडनाईक व त्यांच्या परिवाराने वसंतदादा बँक व अरविंद नागरी पतसंस्था अश्या 2 बँका, दूध संघ यांच्यासह जय लक्ष्मी साखर कारखाना बुडविला असुन त्यातून शेतकरी व लोकांना करोडोचा गंडा घातला आहे. ते घोटाळेही यानिमित्ताने चर्चेला आले असुन तपास यंत्रणाच्या रडारवर आले आहेत. अनेक जणांचे सातबारे विश्वासाने घेऊन त्यावर लाखों रुपयांचे कर्ज घेऊन विश्वासाने गळा कापला. कर्जाच्या नोटीसा आल्याने धास्तीने अनेकांचा जीव घेतला तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
दंडनाईक कॉम्प्लेक्समध्ये कागदोपत्री अनेक उद्योग थाटले गेले व ते सुरु असल्याचे दाखवत कर्ज लाटले. एकप्रकारे जणू दंडनाईक कॉम्प्लेक्स इथे कागदावर उद्योगनगरी स्थापन केली गेली असेच चित्र आहे. बोगस फर्मच्या नावाने कर्ज वाटप केले गेले तर आर्थिक लाभाचे धनी चेअरमन व त्यांचे निकटवर्तीय ठरले. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम बचत खात्यावर जमा होताच, त्याच क्षणी व त्याच दिवशी चेअरमन दंडनाईक यांच्या बचत खात्यावर सर्व कर्जाची रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
बँका बुडविन्याचा दंडनाईक पॅटर्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असुन अनेक ठेवीदार यांचे करोडो रुपये त्यात अडकले आहेत. संघटित आर्थिक गुन्हेगारीचा हा एक प्रकार आहे.
अरविंद नागरी पतसंस्थाचा फसवणूकीचा आकडा वाढला, 18 सप्टेंबरला सुनावणी
वसंतदादा बँकेच्या फसवणूकीनंतर अरविंद बँकेने ठेवीदार यांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून फसविले प्रकरणी चेअरमन रोहितराज दंडनाईक व इतर संचालक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 3 ठेवीदार यांची 10 लाख 25 हजार फसवणूकीचे हे प्रकरण तपासात बरेच वाढले असुन फसवणूकीचा आकडा जवळपास 3 कोटी 40 लाखांच्या पुढे गेला आहे.
10 लाख 25 हजार पैकी 50 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली असुन त्यामुळे त्यांना अटक जामीन अर्जाच्या अंतीम सुनावणी पर्यंत दिलासा मिळाला आहे, त्याची सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान सहकार विभागाचा एक अहवाल समोर आला असुन त्यात अरविंद नागरी पतसंस्थेने 31 मार्च 2019 अखेर ठेवीदार यांचे 2 कोटी 70 लाख ठेवीची मुदत संपुन झाले तरी दिले नसल्याचा ठपका ठेवला आहे त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.
दंडनाईक पिता पुत्रावर यापुर्वी फसवणूकीचे, चेक बाउंस याचे अनेक गुन्हे नोंद असुन कलम 306,307 सह अन्य गंभीर गुन्हे नोंद आहेत.