धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून सध्या वाद सुरु असुन बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी तुळजापूर बंदची हाक दिली आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास पुजारी, व्यापारी व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असुन त्यांनी तुळजापूर शहर बंदचे आवाहन केले आहे.
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु असुन देवीची मंचकी निद्रा सुरु आहे, 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा व त्यातील काही मुद्यावर आक्षेप घेत पुजारी आक्रमक झाले आहेत.पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी याबाबत माहिती दिली.
दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे, दर्शन मंडप जागा बदलल्यास व्यापारी यासह स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थान व मंदिराचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यांचे बुधवारी सायंकाळी 5 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे.
15 ऑक्टोबर पर्यंत यावर सुचना भाविक, पुजारी, व्यापारी, स्थानिक नागरिक यांना करता येणार आहे. 16 ते 17 ऑक्टोबर हे दोन दिवस समक्ष सूचनावर चर्चा होणार आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत नागरिक व भाविकांनी केलेल्या सुचनावर तांत्रिक व प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल व त्यानंतर 26 ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतीम अहवाल सादर करण्यात येणार आहे.