मराठा समाज रात्रभर जागा तर लोकप्रतिनिधी यांचे झोपेचे सोंग
धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन व पुढील दिशा ठरविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात जवळपास 10 ठिकाणी सभा घेतल्या, या सभेला भल्या पहाटे 3 वाजेपर्यंत समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकासह लहान मुले – मुली सुद्धा मोठ्या आशेने रात्रभर जागे राहत सभेला आले.
एकीकडे मराठा समाज रात्री बेरात्री, पहाटेपर्यंत आरक्षण व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जागा असताना मराठा आमदार व गावपुढारकी करणारे काही लोकप्रतिनिधी मात्र शांत, अलिप्त दिसले, एकप्रकारे त्यांनी झोपेचे सोंग घेतले असेच म्हणावे लागेल. आमदार कैलास पाटील वगळता एकही आजी माजी आमदार, मंत्री, खासदार हे एकाही ठिकाणी गेले नाहीत.
लोकप्रतिनिधी यांनी हेतूत सभेला येण्यास टाळले, त्यांना समाजाच्या सध्याच्या स्तिथीचे गांभीर्य नाही व समाजाची फक्त मतापुरती गरज आहे, राजकारणा पलीकडे काही देणे-घेणे नाही अशी संतप्त भावना समाजात उमटत आहे. इतर समाजाला नाराज न करता व्होट बँक जपण्यावरच त्यांनी भर दिल्याचाही आरोप होतोय. पक्षीय भुमिका, दबाव व ओझ्याखाली आजही अनेकजण आहेत तर सामाजिक विषयातील खेकडा प्रवृत्ती काही जणात कायम आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील विधानपरिषदेतील शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज संस्थेचे सुरेश धस, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खासदार रवींद्र गायकवाड हे मराठा लोकप्रतिनिधी आहेत. वर्षानुवर्षे हीच मंडळी आलटून पालटून सत्ता उपभोगत आहेत.यातील एकालाही जिल्हाभरात झालेल्या मराठा आरक्षण सभेला स्वतः जाणे समाजासाठी कर्तव्य, जबाबदारी म्हणून जाणे गरजेचे वाटले नाही.
एरव्ही सहज दर्शन होणारे, गल्ली ते दिल्ली निवेदन व कार्यक्रमाला उपस्थितीत राहणारे लोकप्रतिनिधी त्यादिवशी दिसले नाहीत. आमदार व खासदार यांनी रस्त्यावर येत समाजबांधवात सहभागी होणे तितकेच गरजेचे व अपेक्षित असते मात्र तसे होताना दिसत नाही. काही लोकप्रतिनिधी आम्ही कागदावर, विधानसभा, परिषदेत बोलतो आहोत, लढा देत आहोत असे सांगत आहेत मात्र गेली अनेक दशके त्याला यश आले नाही.
खासदार ओमराजे हे तर मतदार संघात विशेष म्हणजे धाराशिव तालुक्यात असतानाही त्यांनी सभेकडे पाठ फिरवत जाणे टाळले. यासह इतर अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष, गावपुढारी सभेदिवशी जिल्ह्यात होते मात्र त्यांनी सुद्धा पाठ फिरवली. जरांगे यांची आज भुम येथे सभा होणार आहे त्याला माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह इतर नेते जातात का हे पाहावे लागेल.
काही मराठा लोक हे लोकप्रतिनिधी व इतर रूपाने सत्तेत सहभागी असुन ते राज्यासह गावगाडा चालवतात, मराठा समाजातील काही जण धनवान आहेत, उर्वरित लोकांची स्तिथी अत्यंत बिकट बिकट आहे. आर्थिक स्तिथी बिकट असल्याने शिक्षण, मुलींची लग्न, दैनंदिन गरजा भागावीने अवघड झाले आहे तर बेरोजगारी, आत्महत्या याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात भीषण स्तिथी आहे.
मराठा आरक्षण हा विषय भावनिक बरोबर कायदेशीर बनला आहे, तो न्यायप्रविष्ठही आहे शिवाय ओबीसीसह इतर गटाचा उघडपणे विरोध आहे, पक्षीय भुमिका व सत्तेतील सहभाग बाजूला ठेवून ते जाहीर विरोधही करीत आहेत. मराठा आरक्षणावर निर्णय येईल तेव्हा येईल मात्र मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मराठा लोकप्रतिनिधी यांनी उघडपणे त्याच्या मिसळून आधार द्यायला हवा. मराठा लोकप्रतिनिधी यासह मतदारांना आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे.