बोगस गुंठेवारी – यलगट्टे, आवचार व कवडे या त्रिकुटाच्या चौकशीची मागणी
धाराशिव नगर परिषदेच्या कारभाराची त्रयस्थ यंत्रणेकडुन तपासणी गरजेची
आमदार धस यांच्या तक्रारीला महिना उलटला, अहवालकडे लक्ष
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, नगर अभियंता डी जे कवडे व लिपीक गोरोबा आवचार या तिघांनी संगणमताने देवस्थान, वकफ बोर्ड यासह अन्य जमिनीत नियमबाह्य पद्धतीने गुंठेवारी केल्याची लेखी तक्रार माजी नगरसेवक उदयसिंह राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली आहे. या गुंठेवारी प्रकरणांची चौकशी करुन गुंठेवारी रद्द करुन फौजदारी गुन्हे नोंद करावेत अशी मागणी केली आहे. यापूर्वी देखील विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी गुंठेवारी प्रकरणाची तक्रार केली होती त्यानुसार चौकशी सुरु आहे.
यलगट्टे यांच्या भोवतालचा कारवाईचा फास आता अधिक घट्ट होताना दिसत आहे. नगर परिषदेतील सर्व योजनाचा घोटाळा त्यापाठोपाठ धाराशिव तुळजापूर नगर परिषदेत बोगस नौकर भरतीचा आरोप व आता हे बोगस गुंठेवारीचे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात सुरु आहे त्यामुळे यलगट्टे व टीम फिरसे रडारवर आली आहे. अनेक प्रकरणात त्यांच्यावर टांगती तलवार आहे. गुंठेवारीच्या अनेक संचिका गहाळ होऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप धस यांनी केला आहे.
मोजणी शीट नसताना गुंठेवारी मंजुर करणे, अनधिकृतपणे जमिनीच्या क्षेत्राचे तुकडे पाडून गुंठेवारी नियमित करणे, मंजुर विकास आराखड्यातील डी पी रस्ते, मंजुर रेखाकनातील अंतर्गत रस्ते व खुली जागा सार्वजनिक वापरासाठी असतानाही त्या ठिकाणी गुंठेवारी करणे असे प्रकार केले असुन यामुळे शासनाचे महसूली नुकसान झाले आहे त्यामुळे चौकशी करुन गुन्हे नोंद करावेत अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.
धस यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगर परिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी ही चौकशी मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांच्या मार्फत 15 दिवसात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत त्याला आता जवळपास महिना होत आला आहे त्यामुळे त्याच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.