धाराशिव – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकवर दरोडा टाकत लुट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नळदुर्ग पोलिसांना यश मिळाले असुन या टोळीतील एकास अटक करण्यात आली आहे तर टोळीचा मोहरक्या माफिया किंग मिट्टू ठाकुर याच्यासह अन्य आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे ज्या ट्रकवर दरोडा टाकुन त्यातील मुद्देमाल लंपास करण्यात आला, तो मुद्देमाल हा गुटखा होता अशी सूत्रांची माहिती आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
इंद्रजीतसिंह उर्फ मिट्टू ठाकुर याच्यावर यापुर्वी गांजा तस्करी, खुनी हल्ला, गुटखा तस्करी व दरोडा असे गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्याला एका गुन्ह्यात नुकताच उच्च न्यायालयाने तात्पुरता अंतीम सुनावणी पर्यंत जामीन दिली असुन त्या जामीनावर 4 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच मिट्टू ठाकुर याच्यासह टोळीवर दरोड्यासह खंडणीचा गुन्हा नोंद झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळून मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील सय्यद सिराजोद्दीन सय्यद फयाजोद्दीन हा त्याची ट्रकमधुन पान मसाला घेऊन जात असताना नळदुर्ग येथील मिट्टू रणजितसिंग ठाकुर व रोहित राठोड या दोघांसह अन्य 4 जणांनी नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर गोलाई चौकाजवळ ट्रकच्या पुढे पांढऱ्या रंगाची स्कारर्पीओ गाडी आडवी लावून सय्यद सिराजोद्दीन यांचे अंगावर मिर्ची पुड टाकली व गळ्याळा कोयता लावुन लाथाबुक्यानी, फायबरच्या काठीने मारहाण केली.
सय्यद सिराजोद्दीन यांचा चुलत भाउ सय्यद फैराद सय्यद करीम यांना डोक्यात मारहाण करुन सय्यद सिराजोद्दीन व त्यांच्या चुलत भाउ फैराद सय्यद यांना स्कार्पीओ गाडीमध्ये जबरदस्तीने टाकुन घेवून जावून स्वताचे आर्थीक फायद्यासाठी दहशत निर्माण केली व ट्रकसह सुपर पान मसालाचे 50 मोठे पोते, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम 5 हजार व पिवळ्या रंगाची ताडपत्री असा 30 लाख 30 हजार किंमतीचा माल जिवे मारण्याची धमकी देवून बळजबरीने लुटून पसार झाले. नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम 395,386,364(ए),341, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे हे काम पाहत आहेत.
लुटलेला मुद्देमाल पानमसाला सांगितले जात असले तरी नेमकी स्तिथी मुद्देमाल पकडल्यावर स्पष्ट होणार आहे. चोरावर मोर ठरत गुटखा असलेली ट्रक लुटल्याने ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप ‘असा प्रकार होता मात्र नळदुर्ग पोलिसांनी यात मोठ्या शिताफिने गुन्हा नोंद केला असुन अनेक बाबींचा उलघडा होणार आहे.