5 आरोपीना अटक, पोलीस कोठडी – परंडा बाजार समिती राडा प्रकरणी व्याप्ती वाढणार
काही जण रडारवर, अफवांचे ढग कायम – उद्याच्या सभापती निवडीकडे लक्ष
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण करुन जबर मारहाण केल्याप्रकरणी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत गटाचे कार्यकर्ते सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह 5 आरोपीना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीना माढा येथील कोर्टाने 29 मे पर्यंत 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुख्य आरोपी सुरेश उर्फ सूर्यकांत चंद्रकांत कांबळे याच्यासह प्रदीप पाडूळे, समाधान मिस्कीन, किरण उर्फ लादेन बरकडे व जगदीश ठवरे पाटील यांना अटक बार्शी परंडा रोड येथून अटक केली आहे त्यांना पोलिस कोठडी दिली असुन पोलिस इतर फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
गुन्ह्याचा तपास सुरु असुन पडद्यामागून या अपहरण कटात सहभागी असलेल्या काही जणांची नावे समोर आल्यावर आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. आरोपी व त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती जमा करणे सुरु आहे, काही जण रडारवर असल्याचे कळते.
दरम्यान उद्या शुक्रवारी परंडा बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी होणार असुन फोडाफोडी यासह विविध अफवांचे ढग कायम आहेत. निवडीकडे लक्ष लागले असुन वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडे 13 तर भाजप शिवसेना शिंदे यांच्या महायुतीकडे 5 असे पक्षीय बलाबल आहे.
सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे, गणेश जगदाळे, प्रदीप पाडुळे, प्रशांत शिंदे, समाधान मिस्कीन, किरण उर्फ लादेन बरकडे, जगदीश ठवरे पाटील यांच्यासह इतर 30 ते 35 जणांनी मारहाण, अपहरण व बंदूकबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जयकुमार जैन यांनी दिली त्यानुसार टेम्भूर्णी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जैन यांच्यासह सुजित देवकते, रवींद्र जगताप, संजय पवार, दादा घोगरे, सोमनाथ शीरसाठ, शंकर जाधव, हरी नलवडे या 7 संचालकासह हरिश्चंद्र मिस्कीन, किरण शिंदे, सुदाम देशमुख व शरद झोंबाडे अशी मंडळी उजनी येथील विश्रामगृहात मुक्कामी होती त्यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या खिडकीच्या काचा फोडून व दरवाजा फोडून कांबळे व त्यांचे साथीदार तिथे आले व नुकसान केले.
गाडीत बसा, तुम्हाला मस्ती आलीय. सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत आम्हाला मतदान करा म्हणून मारहाण करू लागले. आमची सत्ता आहे, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही असे म्हणत कांबळे व साथीदार यांनी लोखंडी कुकरी, लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने सर्वांना बसवून टेम्भूर्णी बायपास रोडने पंढरपूर येथे नेले. मिरज येथील अज्ञात स्थळी सोडताना कांबळे यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जीवे सोडणार नाही, तुमच्या बरोबर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना देखील जिवंत सोडणार नाही असे म्हणत पिस्तूलीने धाक दाखविला असा जबाब दिला.
टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुरन 337/2023 भादवि कलम 327,326, 324, 363,365,323,143,147,149,452, 504,506, सह आर्म ॲक्ट कलम 3,25 व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंध अधिनियम 1984 चे 3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.