धाराशिव नगर परिषद घोटाळा, प्रक्रिया अंतीम टप्प्यात – 7 दिवसांची मुदत, नोटीसा जारी, फौजदारीचा इशारा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या विविध योजनात झालेल्या अनियमितता व अपहार प्रकरणी कारवाईला वेग आला असुन प्रशासकीय प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह सेवानिवृत्त नगर अभियंता दत्तात्रय कवडे, तत्कालीन स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे, नगर अभियंता भारत विधाते, संदीप दुबे, निलंबित लेखापाल सुरज बोर्डे यांना नोटीसा दिल्या आहेत. यलगट्टे व बोर्डे यांना म्हणणे सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे तर अभिलेखे उपलब्ध न केल्यास व म्हणणे सादर न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
चौकशी समितीस अभिलेखे संचिका उपलब्ध करुन न दिल्याने त्याची चौकशी होऊ शकली नाही तर अनेक प्रकरणात अपुरी कागदे रेकॉर्ड विभागात आहेत. कार्यालयीन अभिलेखे जतन न करणे गंभीर बाब असुन त्यामुळे प्रशासकीय कारवाईसह फौजदारी कारवाई का करू नये याचा खुलासा 7 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी दिले आहेत.