धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात 5 खासगी सावकार व त्याच्या कुटुंबाला दणका दिला असुन सावकारकीत लुबाडलेली 49 एकर जमीन शेतकऱ्याला परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर यांनी दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील बहुचर्चित खासगी सावकार तुकाराम कदम व दत्तू कदम यांनी लुबाडलेली जमीन सावकारकीच्या व्यवहारातील असल्याचे घोषित करीत 49 एकर जमीनीचे खरेदीखत रद्द करुन ती शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. 1 कोटी 30 लाख देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली तरी सावकाराने जमीन परत न केल्याने ज्यादा व्याज व जमीन हडप करण्याचा मोह अंगलट आला आहे.
कदम व त्याच्या कुटुंबातील सावकारांनी बोरगाव येथील शेतकरी सिद्रामप्पा व गुरुसिद्धप्पा मुळे या दोन शेतकऱ्याची जमीन 2004 साली व्याजाने पैसे देऊन खरेदी करुन घेतली होती, व्याजासह पैसे देऊनही जमीन परत न केल्याने त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती, जमिनीची खरेदी केली तरी ताबा हा वर्षानुवर्षे शेतकऱ्याकडे होता त्यामुळे सावकारकी सिद्ध करीत 49 एकर जमीन परत देण्याचे आदेश दिले. ऍड दयानंद बिराजदार, अक्षय बिराजदार व ऍड धनंजय पाडुळे यांनी यात शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडली.
सख्खे भाऊ असलेल्या मुळे या शेतकऱ्यांनी तुळजापूर तालुक्यातील बोरगाव तुपाचे येथील वडिलोपार्जित गट नंबर 31 मधील 12 हेक्टर 22 आर, गट नंबर 54 मधील 5 हेक्टर 12 आर व गट नंबर 22 मधील 2 हेक्टर 23 आर जमीन सावकार तुकाराम कदम व त्याचा मुनीम दत्तू कदम याला व्याजाने पैसे देऊन खरेदीखत करुन दिले होते. 2004 साली त्यांनी 8 लाख 85 हजार व नंतर 2 लाख 20 हजार असे 5 टक्के व्याजाने घेतले.
व्याजाची रक्कम थकल्याने सावकार यांनी टप्प्याटप्प्याने शेतजमीन स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावाने खरेदी करुन घेतली. काही पैसे शेतकऱ्यांनी सावकार कदम याला चेकने बँकेत जमा करुन दिली तरीही जाच सुरूच राहिला. तडजोडीने हा वाद मीटवण्यासाठी 2016 साली सावकारांनी जमीन परत देण्यासाठी 1 कोटी 30 लाख इतक्या रकमेची मागणी केली, शेतकऱ्यांनी तीही रक्कम देण्याची तयारी केली त्यानुसार बँकेत जवळपास 1 कोटी रुपये जमा करीत डीडी भरली व बॉण्ड खरेदी करुन खरेदीचा ड्राफ्ट तयार केला मात्र सावकारांनी जमीन परत केली नाही त्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे धाव घेतली.
कदम सावकाराच्या बाबतीत अनेक तक्रारी यापूर्वी होत्या त्यानंतर वादग्रस्त जमिनीचा ताबा हा शेतकरी यांच्याकडे असल्याने सुनावणी अंती सावकारकी घोषित करुन खरेदीखत रद्द करुन जमीन परत देण्याचे आदेश दिले. सावकारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर यांच्या काळात अनेक सावकारकीची प्रकरणे मार्गी लागत शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.
सावकार तुकाराम खुशाबा कदम यांच्या तीन मुला विरोधात तक्रार दाखल होती त्यात मुलगा अंगद तुकाराम कदम, किशोर तुकाराम कदम, सचिन तुकाराम कदम यांचा समावेश असुन मुनीम दत्तू बाजीराव कदम याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यात मुनीम दत्तू मयत असल्याने त्यांचे वारस पत्नी सुमन, मुली कविता, वर्षाराणी व ज्योती, मुलगा अनिरुद्ध व अनिकेत याच्या विरुद्ध तक्रार होती. सावकार किशोर कदम हा मयत झाल्याने त्याचे वारस पत्नी प्रीती, मुलगी स्वरा व मुलगा पियुष यांच्या बाबतीत केलेले व्यवहार सावकारकी मधुन झाल्याचे आदेश दिले आहेत.