खुल्या जागेत अभिलेख फेरफार, शासनाची फसवणूक – गुन्हा नोंद करण्याची आमदार सुरेश धस यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील प्रसाद गृहनिर्माण संस्थेच्या नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेच्या कागदपत्रात फेरफार करुन गुंठेवारी व बांधकाम परवाना दिल्याच्या प्रकरणात मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यासह सहकार, भुमी अभिलेख कार्यालयातील दोषी अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना आमदार धस यांनी याबाबतचे पत्र दिले आहे तसेच कारवाईचा अहवाल अधिवेशनाच्या अनुषंगाने अवगत करण्यास सांगीतले आहे. विशेष म्हणजे फड यांनी या खुल्या जागेची गुंठेवारी करीत बांधकाम परवाना दिला होता मात्र तक्रार आल्यानंतर त्यांनी तो आदेश रद्द केला होता. या प्रकरणात सहकार, नप, भूमी अभिलेख व महसूल विभागातील अनेक अधिकारी कारवाईच्या रडारवर आहेत.
गुंठेवारीचे हे प्रकरण जुने असले तरी यात नगर परिषद, सहकार, भूमी अभिलेख विभागातील तत्कालीन अधिकारी सहभागी आहेत. यानिमित्ताने शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेची सध्याची स्तिथी, नपकडे असलेला ताबा, रिवाईज लेआउट करुन खुली जागा हडप करणे असे प्रकार समोर येऊ शकतात.खुल्या जागा व गुंठेवारी प्रकरणाचे ऑडिट होणे गरजेचे आहे.
फड यांनी वागमोडे यांच्या प्रकरणात बांधकाम परवाना आदेश रद्द करताना कलम 51 ची कारवाई केली मात्र पुजा प्रसाद पाटील यांच्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांचे कलम 51 नुसार कारवाई करण्याचे लेखी आदेश असतानाही फड यांनी कलम 53,54 ची कारवाई करुन बांधकाम परवानाधारकास एकप्रकारे अभय दिल्याची चर्चा रंगत आहे. पाटील प्रकरणात सुद्धा फड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी आमदार धस यांनी केली आहे. पाटील प्रकरण हे विधीमंडळ अधिवेशनात गेले असुन ते चांगलेच गाजणार आहे.
प्रसाद कृषी गृहनिर्माण संस्थेने सर्व्हे नंबर 129 मध्ये 3 एकर 6 गुंठे इतक्या क्षेत्रावर 2 फेब्रुवारी 1980 रोजी लेआउट केले त्याला 13 फेब्रुवारी 1981 रोजी रेखाकनास अंतीम मंजुरी मिळाली. गृहनिर्माण संस्थेच्या तत्कालीन चेअरमन व सेक्रेटरी यांनी सगनमत करुन रेखाकनात असलेली खुली जागा प्लॉट असल्याचे दाखवून अधिकारी यांच्याशी संगनमत करुन अब्दुल गणीशहा महमद यांना विक्री केली ती जागा गुणवंत वाघमोडे यांना पुन्हा विक्री केली.
जागा मालक गुणवंत वाघमोडे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याशी संगनमत करुन रेखाकनामधील नगर परिषदेची खुली जागा स्वतःच्या नावे दाखवून नामांतर करुन घेतले व त्या जागेची फड यांनी चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी आणि बांधकाम परवाना दिल्याचा आरोप राहुल बागल यांनी तक्रारीत केला आहे. फड यांनी गुंठेवारी नियमीकरण प्रमाणपत्र व नकाशा रद्द केला असुन बांधकाम परवानगीबाबत कलम 51 नुसार कारवाई प्रस्तावित केली आहे.