नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती – धाराशिव नगर परिषद बाबतीत जिल्हाधिकारी यांचे महत्वाचे आदेश
आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा – आमदार सुरेश धस यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचार व विविध तक्रारीच्या अनुषंगाने प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी व सनियंत्रणासाठी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विधान परिषद आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या विविध तक्रारी व त्यावर सुरु असलेल्या चौकशीवर नियंत्रण ठेवणे, अहवाल, पाठपुरावा करणे यासह अन्य जबाबदारी असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव नगर परिषदेवर घमासान चर्चा झाल्यावर नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
धाराशिव नगर परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता बाहेर आली असुन नगर परिषदेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दैनंदिन कामकाज, वीज बिल व इतर कामे करणेस निधी उपलब्ध होत नाही. गुंठेवारी, कागदपत्रे गहाळ यासह नवनवीन तक्रारी प्राप्त होत असुन घोटाळे उघड होत असुन गुन्हे नोंद होत आहेत. धाराशिव नगर परिषदेची स्तिथी पूर्ववत होण्यासाठी आपल्या स्तरावर आयएएस दर्जाचा अधिकारी देण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास करावी अशी मागणी आमदार धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यावर जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी नगर परिषद प्रशासन अधिकारी यांना याबाबत अपर मुख्य सचिव याना अग्रेषित करावे अशे आदेश दिले आहेत.
नगर परिषदेतील भंगार चोरी, बोगस गुंठेवारी, नियमबाह्य बांधकाम परवाने, कागदपत्रे संचिका गहाळ यासह अनेक बाबी विधिमंडळात गाजल्या असुन गुन्हे नोंद झाले आहेत तर काही प्रकरणे चौकशीच्या व कारवाईच्या अंतीम टप्प्यात आहेत.