बेंबळी ग्रामपंचायत घोटाळा – सरपंच व ग्रामसेवक यांना वसुलीची अंतीम नोटीस – प्रशासकीय व फौजदारी कारवाई लालफितीत
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील घोटाळ्याप्रकरणी सरपंच वंदना नवनाथ कांबळे, ग्रामसेवक ए व्ही आगळे यांच्यासह यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता बी बी शिंदे यांना रक्कम वसुलीची अंतीम नोटीस देऊन महिना उलटत आला तरी प्रशासकीय व फौजदारी कारवाई लालफितीच्या कारभारात अडकली आहे. घोटाळ्याचा अहवाल अंतीम होऊन सर्व प्रक्रिया पार पडल्या तरी वसुलपात्र रक्कम भरलेली नाही. कांबळे यांच्याकडे 12 लाख 93 हजार, आगळे यांचेकडे 11 लाख 53 हजार तर शिंदे यांच्याकडे 2 लाख 39 हजार रक्कम वसुलपात्र नोटीसीत दर्शवली आहे.
बेंबळी येथील अभयसिंह गावडे, नवाब पठाण, आकाश मुगळे यासह ग्रामपंचायत सदस्यांनी अपहार व घोटाळ्याची तक्रार केली होती त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तसेच आमदार कैलास पाटील यांनी याबाबत विधीमंडळात तारांकीत प्रश्न मांडला होता.
15 वा वित्त आयोग, अंगणवाडी व शाळेसाठी साहित्य खरेदी, ग्रामपंचायतीसाठी साहित्य खरेदी, गावातील कुटुंबाना कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, कीटकनाशके फवारणी यांसह अन्य बाबीत घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले त्यानंतर प्रत्येकाची वसुलपात्र रक्कम ठरवून ती भरण्याचे आदेश दिले होते. ती रक्कम न भरल्याने प्रशासकीय व फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे असे कळते मात्र त्याला मुहूर्त लागलेला नाही.