राजकीय हस्तक्षेप, दबावतंत्र – बेंबळी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करायला टाळाटाळ
भाजप जिल्हाध्यक्षाची गुन्हा नोंद करायला गेलेल्या अधिकाऱ्याला धमकी
भाजप ही पार्टी विथ करप्शन – आमदार कैलास पाटील यांचा गंभीर आरोप
धाराशिव – समय सारथी
बहुचर्चित बेंबळी ग्रामपंचायत येथे झालेल्या अपहार प्रकरणात गुन्हा नोंद करायला पोलिस विभागाकडुन टाळाटाळ व वेळकाढूपणा होताना दिसत आहे. गुन्हा नोंद करण्यासाठी अधिकारी वारंवार पोलीस ठाण्यात जात आहेत मात्र फिर्याद घेतली जात नाही. विस्तार अधिकारी देशमुख हे तक्रार द्यायला गेले मात्र 12 तास पोलीस ठाण्यात थांबून परत गेले. कधी पोलीस तर कधी पंचायत विभागाकडुन दिरंगाई अश्यात गुन्हा नोंद होताना दिसत नाही.
भाजप ही पार्टी विथ डिफरन्स नसुन ती पार्टी विथ करप्शन असे आहे. भ्रष्टाचारी लोकांना ते दबावतंत्र वापरून पाठीशी घालत आहेत. या प्रकरणात भाजपने राजकीय हस्तक्षेप केल्याने गुन्हा नोंद केला जात नसुन अधिकारी सावध भुमिका घेत आहेत असा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. या भुमिके विरोधात विधीमंडळात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बच्चेसाहेब देशमुख यांना भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची घटना घडली असुन देशमुख यांनी याबाबत पोलिसात कारवाईसाठी लेखी तक्रारी अर्ज दिला त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजप जिल्हाध्यक्ष काळे यांनी धमकी दिल्याने या प्रकरणात भाजपचा हस्तक्षेप असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गुन्हा नोंद होत नसल्याचा आरोप होत आहे.
बेंबळी येथील घोटाळा चांगलाच गाजला असताना घोटाळेबाजाना अभय देण्याचे काम सुरुवातीपासुनच होताना दिसत आहे, कधी चौकशी समितीवर दबाव, कधी रेकॉर्ड गहाळ करणे तर आता थेट अधिकारी यांना धमकावण्यात आले आहे. दरम्यान अजून देखील घोटाळेबाज सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही.
बेंबळी ग्रामपंचायत अपहार प्रकरणात गुन्हा नोंद करण्यासाठी देशमुख यांना प्राधिकृत केले आहे. त्याप्रमाणे देशमुख हे बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी पांडुरंग पवार हे तिथे त्यांचा फोन घेऊन आले व त्यांनी सांगितले की, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे बोलणार आहेत म्हणून फोन दिला त्यावेळी काळे यांनी तुला बघून घेतो, तू नौकरी कसा करतो हे बघून घेतो. भाडखाऊ असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन बघून घेतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
बेंबळी येथील घोटाळ्याप्रकरणी सरपंच वंदना नवनाथ कांबळे, ग्रामसेवक ए व्ही आगळे यांच्यासह यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता बी बी शिंदे यांना रक्कम वसुलीची अंतीम नोटीस देऊन संधी दिली होती त्यातील शिंदे यांनी अपहारातील 2 लाख 39 हजार सरकारच्या खात्यात भरले आहेत. कांबळे यांच्याकडे 12 लाख 93 हजार, आगळे यांचेकडे 11 लाख 53 हजार रक्कम वसुलपात्र आहे.
15 वा वित्त आयोग, अंगणवाडी व शाळेसाठी साहित्य खरेदी, ग्रामपंचायतीसाठी साहित्य खरेदी, गावातील कुटुंबाना कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, कीटकनाशके फवारणी यांसह अन्य बाबीत घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले त्यानंतर प्रत्येकाची वसुलपात्र रक्कम ठरवून ती भरण्याचे आदेश दिले होते.
बेंबळी येथील अभयसिंह गावडे, नवाब पठाण, आकाश मुगळे यासह ग्रामपंचायत सदस्यांनी अपहार व घोटाळ्याची तक्रार केली होती तर शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता त्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली.