बायोमायनिंग प्रकरण – सभागृहात दिशाभुल करणारी माहिती दिल्याचा आरोप,जिल्हाधिकारी यांनी मागविला अहवाल
खतापासुन धाराशिव नगर परिषदेने केला उद्यान विकास – तत्कालीन मुख्याधिकारी व अनेक जण रडारवर
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या बायोमायनिंग प्रकरणात संचिका नगर परिषदेत उपलब्ध असताना ती जाणीवपूर्वक न देता दडविण्यात आली शिवाय सभागृहात माहिती देताना खातरजमा करण्यात आली नाही असा आरोप करीत याची चौकशी करुन अहवाल द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडुन खुलासा मागवीला आहे.
उद्यान विकास घोटाळ्याचा एक पॅटर्न सध्या जोरदार चर्चेत आहे. नगर परिषदेने तब्बल 2 कोटी 22 लाख रुपये घनकचरापासुन खत केले व ते खत नगर परिषदेच्या उद्यानात टाकले असा दावा विधीमंडळ तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केला आहे. खत निर्मिती न करता ठेकेदार याला बिले दिल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
विधिमंडळात चुकीचे उत्तर दिल्याचेही त्यांचे म्हणणे असुन त्याबाबत हक्कभंग व इतर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जवळपास 52 हजार 440 घन मीटर कचऱ्याचे खत करण्यात आले त्यानंतर ते पालिकेच्या उद्यानात टाकण्यात आले असा दावा आहे.
नगर परिषदेच्या सर्व्हे नंबर 348 मधील कचरा डेपो येथे साठलेल्या कचऱ्याचे खत तयार करण्याचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात 2 लाख 34 हजार 190 घन मीटर कचरा होता मात्र त्यापैकी केवळ 52 हजार 440 घन मीटर काम केले व उर्वरित 1 लाख 81 हजार 750 घन मीटर कचरा शिल्लक राहिला. 2 कोटी 22 लाख प्रकल्प पुर्ण झाल्यावर त्याला काम पुर्ण झाल्याचा दाखला काही कर्मचारी यांनी केंद्र स्थानी ठेवून आर्थिक व्यवहारातून केला असा आरोप आहे. तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्या कार्यकाळात हे काम करण्यात आले तर काही बिले हरिकल्याण यलगट्टे यांच्या काळात देण्यात आली.
या प्रकरणाची चौकशी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे मार्फत करण्यात येणार आहे. शहरात उद्याने किती, कोणत्या उद्यानात खत टाकले आणि टाकले तर ती उद्याने बहरली नाही का ? की खतच असे निकृष्ट दर्जाचे होते त्यामुळे बहरलेली उद्याने भकास झाली ? हे प्रश्न समोर येत आहेत.