गुन्हा नोंद होणार का ? आमदार कैलास पाटीलांची तक्रार, जुजबी कारवाईची शिफारस, पाठबळ कोणाचे ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेत अधिकाऱ्यांनी महाघोटाळा केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या महाघोटाळ्यात तब्ब्ल 17 अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले असुन 2 कोटी 32 लाख रुपयांची अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असुन तसे दोषारोप पत्र पाठविले आहे. आमदार कैलास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर व पाठपुराव्यानंतर चौकशी अंती हा घोटाळा उघड झाला.
2 जिल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी, 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा यात समावेश आहे. विभागीय कारवाई, शिस्तभंगाची जुजबी कारवाई करून हा महाघोटाळा दडपला जात असुन याला काही लोकप्रतिनिधी यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याची सुत्रांची माहिती आहे. अधिवेशन काळात यात अनेक घडामोडी घडल्या असुन त्या समोर येणार आहेत. शेतकऱ्यांच्या योजनेवर डल्ला मारणाऱ्या या अधिकाऱ्यांकडुन रक्कम वसुलीची कारवाई करून गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे. 22 कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठात ही चौकशी झाली.
धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 44 लाख 25 हजार, तुळजापूर 44 लाख, कळंब व परंडा तालुका 33 लाख 40 हजार, वाशी 21 लाख 45 हजार, भुम 22 लाख 45 हजार, लोहारा तालुका 22 लाख 37 हजार उमरगा तालुक्यात एका योजनेत 10 लाख 65 हजार तर राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजनेची आकडेवारी उपलब्ध नाही असा शेरा मारला आहे. शेतकरी प्रशिक्षणातही घोळ घातला असुन रक्कम हडप केली आहे.
प्रभारी कृषी उपसंचालक पुरुषोत्तम वाघमारे, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे यांच्यासह तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, तंत्र अधिकारी राहुल दिवाणे, सहायक कृषी अधिकारी राहुल सूर्यवंशी यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे, भुम तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे, परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांगडे, कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, धाराशिव व लोहारा तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख या 8 तालुक्याच्या 7 कृषी अधिकारीसह मंडळ कृषी अधिकारी अणदूर काटकर, काटीचे नागटिळक, नळदुर्गचे एस जी देशमुख व तुळजापूर मंडळ कृषी अधिकारी भोसले या 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात 2025-26 च्या हंगामात कृषी विभागाकडुन वितरित होणाऱ्या कृषी निविष्ठा व फवारणी कीटमध्ये अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे चौकशी अंती उघड झाले आहे. भुमीहीन, मयत, दुबार, बिगर सभासद यांना लाभ दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. लातुर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी 76 पानाचा अहवाल कृषी आयुक्ताना सादर केला आहे. सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र यापूर्वी सादर केलेला चौकशी अहवाल ‘अंतीम’ समजण्यात यावा असे कळविलेले आहे.
सुधारित चौकशी अहवालाच्या नावाखाली काही दुरुस्ती,ताळमेळ घालुन फेरफार करण्याचा घाट होता मात्र तो वेळीच उघडा पडला. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या नियम 3 (1) (एक), 3(1) (दोन), 3(1) (बारा), 3 (1) (सोळा), 3(1) (अठरा), 3 (1) (एकोणीस), 3(1) (एकवीस) व 3(2) चा भंग केलेला असल्याचे दोषारोप पत्रात नमुद केल्याची माहिती आहे. बोगस कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याने यात गुन्हा नोंद करण्यासाठी जनहीत याचिका दाखल करण्यात येणार आहे.











