धाराशिव – समय सारथी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कळंब शहरात संत गजानन महाराज संस्थानची दिंडी दाखल होण्यापूर्वी 2 परिचारिकांना एका शितपेयातून विषबाधा झाली. एका परिचारिकेवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात तर दुसऱ्या परिचारिकेवर लातूर येथे उपचार सुरू असुन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पेय आपल्या ताब्यात घेतले आहे. कंपनी कारवाईच्या रडारवर असुन कारवाई कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
कळंब उपजिल्हा रुग्णालयातील पूजा कल्याण जाधव आणि पल्लवी सौदागर ह्या शनिवारी ड्युटी संपल्यानंतर गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयासमोरील एका दुकानातून शीतपेय घेतले. ते पिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
रविवारी कळंब शहरात शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचा पालखी सोहळा दाखल झाला. तत्पूर्वीच कळंब शहरातील शासकीय रुग्णालयातील 2 परिचारिकांना एक पॅकबंद शितपेय पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडत चालल्याने कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ अंबाजोगाई आणि लातूर येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती कळंब पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हे पेय जेथून आले, तेथून काही स्टॉक ताब्यात घेतला. हे पेय कोणी उपलब्ध करून दिले? ते कोठून आले ? ते किती व कुठे कुठे वाटप करण्यात येणार होते. याचा तपास सुरु आहे.












