तत्कालीन नगररचनाकार सुनील देशपांडे अडचणीत – करोडोचा महसुल बुडाला, वादग्रस्त कारकीर्द
धाराशिव – समय सारथी
तत्कालीन नगररचनाकार सुनील देशपांडे हे अडचणीत आले असुन लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हे नंबर असतानाही तो येत नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. याबाबत आमदार सुरेश धस यांनी तक्रार केली असुन तारांकित प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे. देशपांडे यांची धाराशिव येथील कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे. लाच प्रकरणात ते खुप गाजले होते.
लातूर महानगर पालिकेच्या हद्दीत येणारा सर्व्हे नंबर 262/263 हे हद्दीत असताना ते महानगरपालिका हद्दीत येत नसल्याचे देशपांडे यांनी प्रमाणपत्र लिहून दिले. विशेष म्हणजे तहसीलदार यांनी हा सर्व्हे लातूर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले होते तरीही देशपांडे यांनी ते येत नसल्याचे लिहून दिले. देशपांडे यांचे विकासक यांच्याशी लागेबाधे असल्याचा आरोप केला असुन यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. सदरील सर्व्हे नंबर हे नव्याने स्थापन झालेल्या काशी लिंगेश्वर या ग्रामपंचायतमध्ये समावेश झालेला असल्याने महापालिकेचा करोडो रुपयांचा महसूल व मालमत्ता कराचा भरणा होत नाही तरी याबाबत कारवाई करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एका जमिनीचे अकृषी करण्यासाठी 6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले होते त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना नगर रचनाकार मयुरेश केंद्रे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली, या प्रकरणात सुद्धा देशपांडे यांचे नाव आले होते त्यांना आरोपी करावे म्हणून याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. देशपांडे यांनी पैसे मागितल्याच्या आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
देशपांडे यांच्या बाबत अनेक तक्रारी असुन त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी यासाठी लाचलुचपत विभागाकडे मागणी करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.