गुंठेवारी प्रकरण – संचिका सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेअंतर्गत झालेल्या बोगस गुंठेवारीची चौकशी करावी अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सहआयुक्त नगर परिषद प्रशासनाला गुंठेवारीच्या संचिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
12 मार्च 21 ते 23 नोव्हेंबर 22 या काळात झालेल्या गुंठेवारीची माहिती मागवली असुन त्यात गुंठेवारी धारकांचे नाव, गुंठेवारीसाठी शासनाकडे भरलेली आकारणी फीस याची माहिती मागितली आहे. नगर परिषदेच्या खुल्या जागेवरही गुंठेवारी दिल्याचे प्रकार प्राथमिक चौकशीत समोर आले असुन अंतीम अहवालानंतर याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, नगर अभियंता डी जे कवडे व लिपीक गोरोबा अवचार या तिघांच्या काळात गुंठेवारी झाली असुन अवचार हे लिपीक पदावर असताना त्यांना नगररचना विभागाचा गुंठेवारीचा पदभार नियमबाह्यरित्या दिल्याचाही आरोप आहे तर काही संचिका गायब असल्याची चर्चा आहे.
देवस्थान, वकफ बोर्ड यासह अन्य जमिनीत नियमबाह्य पद्धतीने गुंठेवारी केल्याची लेखी तक्रार यापूर्वी देखील करण्यात आली आहे. गुंठेवारीच्या अनेक संचिका गहाळ होऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
मोजणी शीट नसताना गुंठेवारी मंजुर करणे, अनधिकृतपणे जमिनीच्या क्षेत्राचे तुकडे पाडून गुंठेवारी नियमित करणे, मंजुर विकास आराखड्यातील डीपी रस्ते, मंजुर रेखाकनातील अंतर्गत रस्ते व खुली जागा सार्वजनिक वापरासाठी असतानाही त्या ठिकाणी गुंठेवारी करणे असे प्रकार केले असुन यामुळे शासनाचे महसूली नुकसान झाले आहे त्यामुळे चौकशी करुन गुन्हे नोंद करावेत अशी मागणी धस यांनी केली आहे.