पवनचक्की मारहाण, अपहरण प्रकरण – सेनेचे आनंद पाटील यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
धाराशिव – समय सारथी
पवनचक्की कर्मचाऱ्यांना मारहाण व अपहरण प्रकरणी शिवसेनेचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद पाटील यांना उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
6 जून रोजी उमरगा तालुक्यातील कोराळ येथे पवनचक्कीचे काम बंद करून अपहरण ,मारहाण व धमकी प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद पाटील यांच्यासह इतर 16 जणां विरोधात 7 जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आपण निर्दोष असुन या प्रकरणात जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने व त्यांच्या मामाने राजकीय द्वेषापोटी कारवाई केली असुन याबाबतचे सत्य व वस्तूस्तिथी लवकरच जामीन झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन सांगू असे पाटील म्हणाले होते. पालकमंत्री डॉ सावंत यांचा या प्रकरणात कोणताही संबंध नाही, विरोधकांनी त्यांना बदनाम केले असे पाटील म्हणाले.
आता जामीन झाल्यावर पाटील हे पवनचक्की माफियावर नेमका काय हल्लाबोल करीत पोलखोल करतात याकडे लक्ष लागले आहे.