भूमी उपाधीक्षक पंडीत डोईफोडे यांची आत्महत्या
जाच व त्रास – कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद
तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर येथील भुमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक पंडीत डोईफोडे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी त्यांच्या कार्यालयातील ३ कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून यात कर्मचारी एस.एन. सुर्यवंशी, एस.एस. ढोले, ए.ए. माने यांचा समावेश आहे. या आत्महत्या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तुळजापूर भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी एस.एन. सुर्यवंशी, एस.एस. ढोले, ए.ए. माने यांनी खोट्या सह्यांची बनावट कागदपत्रे, फेरफार व इतर कार्यालयीन कागदपत्र बनवली होती. यावरुन कार्यालय प्रमुख उपअधीक्षक पंडीत डोईफोडे यांनी या तीघांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याने हे कर्मचारी पंडीत डोईफोडे यांना वेळोवेळी मानसिक त्रास देत होते. त्यांच्या या त्रासास कंटाळून पंडीत डोईफोडे यांनी ४ जानेवारी रोजी तुळजापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे अशी फिर्याद मयत पंडीत डोईफोडे यांचे भाऊ मारुती डोईफोडे यांनी दिल्याने तीघांविरुध्द कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.