कोर्टाचे आदेश – दर्गाहची जमीन शर्तभंग झाल्याने ताब्यात घ्या, प्लॉटिंग व 99 वर्षाचा करार
मुतवल्ली सय्यद व इतरांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश – कारवाईकडे लक्ष, अभय कोणाचे ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (शरण शहावली) दर्गाहची जमीन शर्तभंग झाल्याने ती जिल्हा वकफ अधिकारी यांनी ताब्यात घ्यावी व दर्गाची पुजा अर्चा व सर्व विधी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी असे आदेश अतियात न्यायालय तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ योगेश खरमाटे यांनी दिले आहेत. ही जमीन दर्गाह पुजा व सेवा म्हणजे खिदमत करण्यासाठी दिली होती मात्र त्याचा वापर प्लॉटिंग तसेच बॉण्डवर 99 वर्षाच्या भाडे करार करुन देण्यात आली त्यामुळे शर्तभंग झाला. मुतवल्ली सय्यद सरफराज हुसैनी यांचा विरासत मंजुरीचा अर्ज फेरचौकशीत नामंजूर करताना हे आदेश दिले.
दर्गाह जमिनीचा प्लॉटिंग व इतर कामासाठी विक्री केल्याच्या प्रकरणात सय्यद सरफराज हुसैनी, सय्यद रफिक व त्यांच्या कुटुंबावर कलम 420,467,468,471 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश महाराष्ट्र वकफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा वकफ अधिकारी अहमद खान यांना 23 जानेवारी 2020 रोजी दिले होते मात्र त्या आदेशाचे खान यांनी पालन न केल्याचे समोर आले आहे. 3 वर्ष होऊनही अद्याप गुन्हा नोंद न झाल्याने अभय कोणाचे हा प्रश्न समोर आला आहे. फौजदारी प्रक्रियेच्या आदेशाचे पालन न केल्याने जिल्हा वकफ अधिकारी खान यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे, ते यात सहआरोपी होऊ शकतात.
सय्यदशाह अब्दुल्ला हुसैनी यांच्या मृत्यूनंतर 1995 साली दाखल केलेली विरासत कार्यवाही 2016 मध्ये मंजुर केली होती त्यानंतर त्याला 2017 मध्ये अपर जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिली. सय्यद हे महाराष्ट्र महसूल प्राधिकरण यांच्या न्यायालयात गेल्यावर या प्रकरणात अपर जिल्हाधिकारी यांनी 2017 चा निकाल कायम ठेवत फेरचौकशी करीता हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवले त्यात जागेच्या सद्य स्तिथीचा पंचनामा, कागदपत्रे व सुनावणी अंती विरासत नामंजूर करण्यात आली तसेच जमीन ताब्यात घेण्याची कारवाई करावी असे आदेश दिले.
धाराशिव शहरातील सर्व्हे नंबर 246 मधील 22 एकर 17 गुंठे, सर्व्हे नंबर 284 मधील 27 एकर 5 गुंठे, सर्व्हे नंबर 285 मधील 17 एकर 33 गुंठे, सर्व्हे नंबर 427 मधील 13 एकर 1 गुंठा, सर्व्हे नंबर 355 मधील 27 एकर 4 गुंठे, 356 मधील 21 एकर 16 गुंठे, 428 मधील 21 एकर 38 गुंठे, 459 मधील 34 एकर 4 गुंठे, 460 मधील 21 एकर 33 गुंठे, 462 मधील 29 एकर व 463 मधील 34 एकर 29 गुंठे अश्या 11 सर्व्हे नंबर मधील जमिनीचा वाद कोर्टात गेला होता त्यात पंचनामामध्ये 246 गट नंबर वागळता सर्व ठिकाणी शर्तभंग झाला आहे, जवळपास 247 एकर इतक्या जमिनीचा शर्तभंग झाला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात असलेल्या या वकफ बोर्डाच्या जमिनी दर्गाह सेवा इनाम (मशरतुल खिदमत) साठी देण्यात आल्या होत्या मात्र त्याची विक्री व भाडेतत्वावर देण्यात आल्या तर काही जमिनी ह्या तलावासाठी संपदीत झाल्यावर त्याचा करोडो रुपयांचा भुसंपादन मावेजा या लोकांनी संगणमताने लाटला आहे त्यामुळे तो महसूली पद्धतीने वसुल करावा अशी मागणी होत आहे. धाराशिव शहरात सध्या दर्गाहची वेगवेगळ्या प्रयोजनाची जवळपास 450 एकर जमीन असुन त्याच्या सात बारा उताऱ्यावर वर्ग 2 ची नोंद करण्यात आल्याने तूर्तास तरी खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत.
वकफ नियमांचा भंग केल्याने या खिदममास स्वरूपाच्या जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे यात नेमकी पुढे काय प्रक्रिया होते याकडे लक्ष लागले आहे. वकफच्या या जमिनीवर सध्या टोलेजंग इमारती, प्लॉटिंग व घरे आहेत. या जमिनी विकून सय्यद व इतरांनी करोडो रुपयांची संपत्ती कमावली आहे त्यामुळे सय्यद यांच्यासह इतरांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.