उस्मानाबाद –
आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक 58 रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात 11,तुळजापूर 8, उमरगा 9, लोहारा 6,कळंब 10 ,वाशी 4, भूम 2 व परंडा तालुक्यात 8 रुग्ण सापडले आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 296 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दिवसेंदिवस उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असुन अनेक लोक बेफिकीरपणे खुलेआम फिरत आहेत.
कोरोना बाधीत रुग्ण वाढण्याचा आलेख हा वाढत असताना प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. 2 मार्चला 40 रुग्ण,3 मार्च 16,4 मार्च 45,5 मार्चला 26, 6 मार्चला 30, 7 मार्च 49, 8 मार्च 16,9 मार्च 38, 10 मार्च 24 तर 11 मार्चला सर्वाधिक 58 रुग्ण सापडले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 33 हजार 865 नमुने तपासले त्यापैकी 17 हजार 680 रुग्ण सापडले म्हणजेच रुग्ण सापडण्याच दर 13.67 टक्के आहे. जिल्ह्यात 16 हजार 758 रुग्ण बरे झाले असून 95 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे.कोरोना संकटात आजवर 586 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.32 टक्के मृत्यू दर आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.एकूण 1400 बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यात 200 व्हेंटिलेटर तर 1200 ऑक्सिजन बेडचा समावेश आहे
स्तिथी हाताबाहेर गेल्यास तुळजाभवानी मंदिर बंदबाबत कटू निर्णय घेणार – जिल्हाधिकारी
उस्मानाबाद जिल्हा हा पर्यटन पूरक जिल्हा असून तुळजाभवानी मंदिर सध्या तरी पूर्णतः बंद करण्यात येणार नाही मात्र भाविक , पुजारी व व्यापारी यांनी मास्कचा व नियमावलीची अंमलबजावणी न केल्यास कोरोना रुग्णाची संख्या वाढून स्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे तत्कालीन स्थिती पाहून कटू निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते असा सूचक इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. लॉकडाऊनचे चक्र हे न परवडणारे असून सर्वानी गांभीर्य ओळखून वागले तर कोरोना नियंत्रण शक्य आहे. तुळजापूरसह इतर धार्मिक क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी पुजारी व भाविक यांच्या कोरोना तपासणी करण्यात येणार असून धार्मिक व पर्यटन क्षेत्रात नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी ३ महिने पुरेल इतका औषध साठा , ऑक्सिजन पुरवठा, तपासणी व उपचारासाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर चाचणीची संख्या वाढविणे तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार पद्धतीवर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण लॉकडाऊन लागू नये ही प्रशासनाची इच्छा असल्याची भूमिका जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसात रुग्णाची संख्या तिपटीने वाढत आहे त्यामुळे १८ पोलीस स्थानकाच्या हद्दीत महसूल पोलीस विभागाची संयुक्त पथके प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाईसाठी नेमण्यात आली आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात ११०० ऑक्सिजन सिलेंडर उपलब्द असून २०० ऑक्सिजन बेड तयार आहेत. तपासणी संख्या वाढावी यासाठी कोरोना टेस्टिंग लॅब नव्याने जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले असून यापुढे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु असणार असून त्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे , मंदिरे ही दर रविवारी बंद राहणार आहेत. धार्मिक विधीना केवळ 5 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून या ठिकाणी नो मास्क नो एन्ट्री हा नियम लागू असणार आहे. जिम , क्रीडांगणे, व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील तर मोठ्या स्पर्धा घेण्यावर बंदी असणार आहे. उस्मानाबाद जिल्हयात सभा मोर्चे उपोषण आंदोलन यांना बंदी असणार असून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये फंक्शन हॉल लॉन्स हे बंद राहतील तसेच जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू राहणार असून विनाकारण रात्रीच्या प्रवासावर बंदी असणार आहे.