धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाल्यानंतर त्यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कार व इतर विधी करण्यात आले. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा ह्या डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. या दुखाच्या काळात डॉ पाटील परिवार सुनेत्रा ताई यांच्या पाठीशी राहिला त्यांना माहेरचा मोठा आधार आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील यांनी दिला.
अजित पवार हे अनंतात विलीन झाल्याने आता त्यांच्या आठवणी व विचारांची शिदोरी आहे. अंत्यसंस्कार ते तिसरा दिवसाचा राख सावडणे विधी या काळात पाटील परिवाराने आधार दिला, यापुढेही तेचं स्नेह व पाठबळ पाटील परिवार सुनेत्रा ताई व त्यांच्या कुटुंबाला देणार आहे.
धाराशिवचे जावई असे ते अभिमानाने सांगत अनेक प्रश्न मार्गी लावत, निधी उपलब्धता असो की इतर ते आपुलकीने व प्राधान्याने काम करीत असत. मेहुणे म्हणून आमचे नाते केवळ कौटुंबिक नव्हतं, तर विश्वास, आपुलकी आणि परस्पर आदराचे होते असे म्हणत राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आठवणीना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्रिमंडळात एकत्र काम करताना त्यांच्या कार्यक्षमतेचा, ठाम निर्णय क्षमतेचा आणि राज्यासाठीच्या तळमळीचा अनुभव मी स्वतः अनेकदा प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, सहकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांचे मेहुणे व माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिली आहे.
पाटबंधारे मंत्री, ऊर्जा मंत्री, गृहमंत्री म्हणून काम करताना डॉ पाटील हे शरद पवार यांचे अंत्यत विश्वासू व कट्टर समर्थक बनले. त्या दरम्यानच सुनेत्रा पवार व अजित पवार यांचा विवाह ठरला होता. त्यामुळे डॉ पद्मसिंह पाटील व शरद पवार यांचे पारिवारीक जवळचे संबंध निर्माण झाले होते. अजित पवार यांच्या दुःख निधनामुळे तेरसह धाराशिव जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता.












