धाराशिव – समय सारथी
पैसा,सत्ता,राजकारण व गुन्हेगारी क्षेत्र या नात्याची वीण धाराशिव जिल्ह्यात मागील काही वर्षापासुन अधिक घट्ट होताना दिसत आहे. पुण्यातील एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा ‘शार्प शुटर’ अशी ओळख असलेला एक ‘डॉन’ आता धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना शिंदे पक्षाकडून उभा राहिला आहे. विकासाच्या ‘गोंडस’ नावाखाली गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात लोकांचे ‘उद्दातीकरण’ करून त्यांना ‘राजाश्रय’ देण्याचा नवीन विचार व धोरण सध्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात रुजत आहे.
पुणे येथील गजानन उर्फ गजा मारणे टोळीचा ‘शार्प शुटर’ अशी गुन्हेगारी जगतात ओळख असलेला सुनील बनसोडे हा धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय ‘नशीब’ आजमावत आहे, त्याला तुळजापूर तालुक्यातील शहापुर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. बनसोडे हा मारणे याचा ‘उजवा हात’ म्हणुन ओळखला जात असुन तो टोळीतील ‘टॉप हॅन्ड’ आहे. टोळी युद्धातुन अनेक वेळा कारवाई झाली आहे.
अनेक वर्षांपासुन फरार असलेल्या बनसोडे याला पुणे शहर पोलिसांच्या झोन 3 पथकाने मागील काही महिन्यापुर्वी वारजे माळवाडी येथुन अटक केली होती. बनसोडे याच्यावर अनेक गुन्हे नोंद असुन ‘जंत्री’ मोठी आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्शवभुमी व ‘साम्राज्य’ असले तरी गावाकडे ‘उपद्रव’ नाही असेही स्थानिक सांगतात. गुन्हेगारी जगत ते थेट राजकारण हा प्रवास रंजक असुन आता विकासाचा ‘ध्यास’ लागला आहे.
सुनील बनसोडे हा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शहापुर जिल्हा परिषद गटातुन शिवसेना शिंदे गटातुन ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर उभा आहे. मुळ गाव काटी असलेले बनसोडे शहापूर येथे निवडणुकीच्या रिंगणात असुन पुण्यात स्थायीक आहे. शिवसेनेला इथे मतदार संघ गटातील दुसरा ‘सक्षम’ उमेदवार मिळाला नाही हे विशेष. या गटात अशोक जाधव राष्ट्रवादी शरद पवार गट, कचरू सगट शिवसेना उबाठा गट, लिंगय्या स्वामी हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विकासाच्या ‘गप्पा’ बरोबर अधुनमधुन गुन्हेगारी क्षेत्रातील ‘भाषा’ मतदारांच्या कानी पडेल व गरजेनुसार ‘डोस’ देतील अशी चर्चा आहे.
जागा वाटपात टोकाची ‘रस्सीखेच’ करणाऱ्या भाजपने शहापूर जिल्हा परिषद गटाची जागा शिवसेनेच्या ‘गळ्यात’ घातली व शहापूर पंचायत समिती गणात भाजपचा उमेदवार दिला आहे. शिवसेनेच्या जागेवर स्वतःच्या पक्षातील उमेदवार एबी फॉर्म देऊन उभे करण्याचे ‘दिव्य’ काम काही ठिकाणी केले. विश्वासाने दिलेले एबी फ्रॉम चुकीच्या पद्धतीने वाटप झाल्याने हा गोंधळ उडाल्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी सांगितले. तुळजापुर तालुक्यात शिवसेनेला एकमेव जागा दिली, ती ही वादग्रस्त उमेदवारासह.. इथले एबी फॉम व अधिकार कोणाकडे होते ? कोणत्या नेत्यांच्या दबाव व ‘संमती’ने हे घडले, असा सवाल शिवसैनिक करीत आहेत.
जाहीर सभेत गुन्हेगारी, अवैध धंदे यांचे निर्मूलन व उच्चाटन करण्याची भाषा करणारे काही नेते अपप्रवृत्तीना ‘राजाश्रय’ देऊन खतपाणी देत आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना टिकेचे ‘धनी’ व्हावे लागले होते. आता या प्रकरणात शिवसेना चांगलीच कोंडीत सापडली असुन तोंडावर पडली आहे. बनसोडे याने भाजपकडुन उमेदवारी अर्ज भरला होता मात्र भाजपने यावेळी ‘सेफ’ कार्ड खेळले.
माहितीनुसार बनसोडे याची राजकीय एन्ट्री एका ‘गॉड फादर’च्या मध्यस्थीने भाजपाच्या माध्यमातुन झाली मात्र वाद नको म्हणुन उमेदवारी शिवसेनेकडुन मिळाली. बनसोडे याने अपक्ष, भाजप व शिवसेना असे अर्ज भरले मात्र शिवसेनेने ठाम ‘विश्वास’ दाखवला. शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी मात्र यापासुन अनभिज्ञ असुन ‘बोट’ दाखवीत आहेत. उमेदवारीला निकष कोणता असाही सवाल करीत आहेत. हा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भुम, परंडा, वाशी या भागात पुणे येथील निलेश घायवळ व त्याच्या टोळीचा हस्तक्षेप पवनचक्कीसह अनेक कारवायात दिसुन आला, त्याच्यावर काही अदखलपात्र गुन्हेही नोंद झाले, त्याला तिथे कामापुरता ‘राजाश्रय’ मिळाला. त्यानंतर आता बनसोडेच्या रूपाने पुणे येथील दुसऱ्या एका टोळीची थेट राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे. विकास रुपी सत्तेत थेट ‘वाटा’ देऊन ‘लाभार्थी’ बनण्याचे प्रयत्न सुरु आहेत.











