धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती झाली असल्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जाहीर केले आहे. भुम परंडा वाशी मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या 13 व पंचायत समितीच्या 26 जागा शिवसेना पक्षाच्या वाट्याला आल्या असुन त्यावर शिवसेनेने दावा केला आहे. या ठिकाणी भाजपने उमेदवार दिले आहेत. चर्चे अंती काही तरी सकारात्मक मार्ग निघेल याची आम्हाला खात्री आहे असे पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांची बंगल्यावर भेट घेतली. त्या चर्चेवर पालकमंत्री सरनाईक यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. भुम परंडा बाबत चर्चेला भाजपचे नेते व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह इतर नेते सहमती दर्शवून भाजपचे उमेदवारी अर्ज मागे घेणार का ? हे पाहावे लागेल.
नगर परिषदेला भुम परंडा वाशी येथे शिवसेना विरोधात भाजप, राष्ट्रवादी व इतर सर्व पक्ष होते. जिल्हा परिषदेला आमदार राणाजगजीतसिंह इथे नेत्यांची ‘मनधरणी’ करून काही ‘चमत्कार’ करतात का ? ते पाहावे लागेल. शिवसेना भाजप महायुती, जागावाटप व शिवसेनेचच्या जागेवर भाजप उमेदवार यांना उमेदवारी देण्यात येण्याच्या मुद्यावरून नाराजी व घमासान सुरु आहे. शिवसेनेचे एबी फॉर्म भाजपने त्याच्या पदाधिकारी यांना वाटले त्यामुळे शिवसैनिक संतप्त आहेत.
आम्ही लपून भेटत नाही, आम्ही भेटलो ही वस्तुस्तिथी आहे. धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता यावी यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसैनिक यांनी माझ्या समोर भावना व्यक्त केल्या त्या मी मांडल्या. काही ठिकाणी बदल करावे लागतील असे मी सांगितले. आमची झालेली चर्चा काही प्रमाणात यशस्वी झाली त्यानंतर मी पुन्हा जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, इतर पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यातून मार्ग निघेल व प्रचाराची दिशा ठरवून महायुतीला जास्तीत जास्त यश मिळेल.
शिवसेना व भाजप युतीचा फॉर्मुला ठरलेला असुन त्यात बदल होणार नाही. भुम परंडा वाशी मतदार संघातील 13 जागा व इतर उर्वरित 3 विधानसभा मतदार संघात 10 अश्या 55 पैकी 23 जिल्हा परिषद जागा शिवसेना लढणार आहे. भुम परंडा विधानसभा मतदार सांगत 26 जागा व इतर मतदार संघात 24 अश्या 50 पंचायत समिती जागा शिवसेना महायुती म्हणुन लढणार आहे. हे धोरण मुंबई येथे ठरले असुन काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे ते आम्ही चर्चा करून शमवणार आहोत.
शिवसैनिक यांच्यावर अन्याय होणार नाही, काहींना स्वीकृत तर काहींना शासकीय समिती, महामंडळ दिले जाईल त्यासाठी मी पालकमंत्री म्हणुन, राजन साळवी संपर्क प्रमुख म्हणुन शब्द देतील, जेणेकरून निवडणुका सुरळीत पार पडतील. आमची चर्चा सुरु असुन भाजप त्यांच्या लोकांशी चर्चा करीत आहे, आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करीत आहोत. समनव्याने तोडगा निघणार आहे, जो वाद विवाद झाला होता तो मी पालकमंत्री यां नात्याने शमवण्यासाठी प्रयत्न करणार त्यात 100 टक्के यश येईल याची खात्री आहे.
जागा वाढणार नाहीत, मुंबई जे धोरण ठरले तेच अंतीम असणार आहे. काही ठिकाणी त्यांच्या लोकांनी तर काही ठिकाणी आमच्या लोकांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या भावना आहेत, शिवसैनिक म्हणुन त्यांना मानाचे स्थान देऊ, ती जबाबदारी माझी आहे असे ते म्हणाले.











