शिवसेनेच्या जागेवर भाजपचे उमेदवार, शिवसैनिकांची नाराजी, संतप्त सवाल
पक्ष कितीला विकला, भाजप दावणीला का बांधला – आरोपांचे वादळं
धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे आजपासुन 2 दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जागा वाटप व शिवसैनिक यांना उमेदवारी न मिळाल्याच्या मुद्यावरून शिवसैनिक संतप्त असुन ते आक्रमक भूमिकेत आहेत. पालकमंत्री सरनाईक यांची या सगळ्याला संमती कशामुळे होती ? हे का व कशासाठी घडले असा शिवसैनिक यांचा सवाल आहे. काही ठिकाणी शिवसैनिक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले असुन बंडाचे निशाण फडकविले आहे. सरनाईक हे या शिवसैनिकांची समजुत कशी काढणार, आरोपांच वादळं कसं शमवणार हे पाहावे लागेल.
एरव्ही आक्रमकपणे विरोध करणारी ‘टीम राणा दादा’ रुपी भाजपा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत इच्छित बाबी साध्य झाल्याने यावेळी मात्र पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या स्वागतासाठी ‘पायघड्या’ घालुन सज्ज आहे. शिवसेना भाजप नेत्यात युती तर कार्यकर्त्यात कुस्ती अशी काहीशी स्तिथी आहे. 140 कोटींची कामे लाडक्या ठेकेदाराला दिली तर जिल्हा नियोजन समितीची तक्रार मागे घेतली. नेत्यांची दिलजमाई होत ‘मधुर’ संबंध झाले असले तरी शिवसैनिकात ‘कटूता’ वाढली आहे.
शिवसेना पक्ष कितीला विकला, भाजपच्या दावणीला का बांधला, सक्षम उमेदवार असताना आयात भाजप उमेदवार यांना कोणत्या निकषाच्या आधारे संधी दिली असे अनेक सवाल शिवसैनिकांचे असुन संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप करीत आक्षेप घेतले आहेत. साळवी यांनी एबी फॉर्म भाजपच्या हातात का दिले ? बंगल्यावर काय घडले, कितीत मॅनेज झाले व निघुन गेले. हे ‘साळवी’ नसुन शिवसेनेला लागलेली ‘वाळवी’ आहे असे म्हणत जोरदार टीका केली. साळवी शिवसैनिकांच्या निशाण्यावर आहेत.
बंद खोली आड शिवसैनिकांना विश्वासात न घेता भाजप शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत जागा वाटपाचा खेळ खेळला. जागा वाटप होऊन शिवसेनेच्या जागेवर भाजपचे उमेदवार दिले असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. काही ठिकाणी एबी फॉर्मवर दोन नंबरवर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्ते यांची नावे आहेत त्यामुळे त्यांना थोडीफार भोळी आशा आहे मात्र सद्य स्तिथी पाहता ही शक्यता धूसर आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजप राष्ट्रवादी अशी महायुती दाखवण्यासाठी काही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्या मात्र त्या जागेवर आयात भाजप कार्यकर्ते यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी पक्ष प्रवेश कधी व कोणाच्या हस्ते केला, मतदार संघ व पक्षाचा संबंध नसताना असे का हा संतप्त सवाल शिवसैनिक करीत आहेत. धाराशिव कळंब येथे शिवसेनेची ताकत जास्त आहे.
शिवसेनेच्या जागेवर जसे भाजप उमेदवार उभे केले तसे भाजप जागेवर शिवसेना उमेदवार का दिले नाहीत. असेल तर दाखवा असे शिवसैनिक म्हणत आहेत. निवडणुकीच्या पार्शवभुमी व शिवसेना पक्षात उडालेला गोंधळ पाहता सरनाईक यांचा 25 व 26 जानेवारी हा 2 दिवशीय दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे. 25 रोजी पालकमंत्री मुक्कामी असुन 26 जानेवारीला त्यांच्या हस्ते 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदान येथे होणार आहे.
महायुतीच्या जिल्हा परिषद प्रचार बॅनरवरून आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकारी यांचे फोटो पद्धतशीरपणे वगळण्यात आले आहेत. सावंत हे शिवसैनिक यांची बाजु मांडत असल्याने त्यांची विरोधी भुमिका आहे असे म्हणत त्यांचे फोटो लावले जात नाहीत, त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र यायचे, उमेदवारी द्यायची, रसद पुरवायची तर मग ही कसली महायुती.. असाही सवाल होत आहे. विरोध कोण करणार, त्याचं पाहून घेऊ ? त्यांचे पद काढायला लावु व त्यांच्या पक्षातील आपला माणुस बसवु अशी रणनिती आखत पक्षश्रेष्टीना हाताशी धरत व शिवसैनिकांना गृहीत धरून हे सगळे सुरु आहे. आमदार सावंत यांनी मात्र त्यांची भुमीका व बाणा कायम ठेवली आहे, तोच शिवसैनिकांचा आधार ठरत आहे.
धाराशिव नगर परिषदेत शिवसेना पक्षाला अध्यक्ष पद व इतर नगरसेवक पदाचे उमेदवार देऊ दिले नाहीत, शिवसैनिक काय करतात हे पाहण्यासाठी ती एक लिटमस टेस्ट होती. त्यानंतर एक पाऊल पुढे टाकत जिल्हा परिषदेला तर थेट शिवसेना जागेवर भाजप उमेदवार देण्याचे काम केले गेले. धाराशिव, तुळजापूर, कळंब या 3 तालुक्यात शिवसेना गटाचा आमदार नसल्याने व वरिष्ठाना भिडेल असे पक्षीय नेतृत्व नसल्याने हा डाव खेळला गेला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना किंमत न देता वरिष्ठ नेत्यांशी जुळवून घेतले. सगळे पक्ष खिशात ही खेळी करून ते अलिप्त आहेत. आमदार सावंत यांनी सुद्धा राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर 5 पक्ष खिशात ठेवत असल्याची जाहीर टीका केली होती.












