धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील पाणबुडी मोटार व विद्युत केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कामगिरी करत 98 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
याप्रकरणी फिर्यादी विजय महादेव गुरव (वय ३३, व्यवसाय शेती, रा. सिध्देश्वर वडगाव, ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 16 जानेवारी वडगाव सिध्देश्वर शेत शिवारातील त्यांच्या शेतातील विहिरीतून 5 एच.पी. रेन्बो कंपनीची पाणबुडी मोटार व 55 ते 60 फूट केबल असा सुमारे 12 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार होती.
या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विष्णू बेळे हे करीत असताना निष्पन्न आरोपीने धाराशिव, सोलापूर, बीड व लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आपल्या साथीदारांसह शेतातील मोटार चोरी, वायर चोरी तसेच विद्युत पोलवरील तारा चोरी केल्याची कबुली दिली.
तपासात चोरीस गेलेला मुद्देमाल हा मुरुड (ता. जि. लातूर) येथे नेऊन विकल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी कारवाई करत 9 हजार 687 किलो विविध प्रकारचा तांबा (कॉपर) किंमत अंदाजे 96 लाख रुपये तसेच 750 किलो अॅल्युमिनियम विद्युत तारा किंमत अंदाजे 1 लाख 50 हजार रुपये असा एकूण 98 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार जी पी मिसाळ, पोलीस नाईक एस आर क्षीरसागर, पोलीस नाईक बक्कल व्ही. एम. बेळे (तपासी अंमलदार) यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून, जिल्ह्यातील मालमत्ता चोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला आहे.










