पळसप गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आणि जिंकणार – अजित लाकाळाचा संकल्प
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लढविण्यासाठी अजित लाकाळ यांनी मुंबई येथील नंदनवन येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मी पळसप गटामधून निवडणूक लढणार असून तुमचे आशिर्वाद मिळायला पाहिजेत असे साकडे लाकाळ यांनी घातले.
त्यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तू निवडणूक लढ, जिल्हा परिषदेच्या सभागृहात जा, माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आशिर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मी जिल्हा परिषदची निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी व्यक्त केला. पळसप येथे शिवसेनेच्या जागेवर भाजपचे नेताजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
खुद्द पक्षप्रमुखाचे आशिर्वाद असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ते कामाला लागले आहेत. धाराशिव तालुक्यातील पळसप जिल्हा परिषद गटातून शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी पळसप व परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करून त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. विशेष म्हणजे गावोगावी पेवर ब्लॉक बसविण्यासह या भागातील खास शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना राबवावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनापासून मंत्रालय स्तरावरपर्यंत यशस्वी पाठपुरावा करून गावांचा समावेश करून घेतला आहे. तसेच त्यांनी संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनांचा निराधार यांना लाभ मिळवून दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासह आरोग्याच्या सुविधा देखील दर्जेदार मिळाव्यात यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणे व ॲम्बुलन्स करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
पळसप गावांतर्गत डांबरीकरणाचे रस्त्यांचे जाळे मजबूत केले आहे. तसेच विद्यमान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे या मतदारसंघातील रस्ता व इतर कामे करण्यासाठी प्रस्ताव दिला असून ते लवकरच मार्गी लावणार आहेत. लाकाळ यांनी ही कामे ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांनी या मतदारसंघांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क मोठा असून प्रत्येक गावी त्यांनी कामाच्या माध्यमातून मोठे नेटवर्क उभा केलेले आहे. त्यामुळे ते या मतदारसंघात निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा सूर नागरिकांमधून निघत आहे.











