धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत ‘यशवंत सेना ‘ नावाच्या रूपाने एक नवीन पर्याय देण्यात आला आहे. शिवसैनिक व इतर पक्षातील ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी ‘यशवंत सेनेचा’ मार्ग निवडला आहे. धाराशिव, तुळजापूर व कळंब या 3 तालुक्यात काही इच्छुकांनी हा मार्ग स्वीकारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या गटाचे महाविकास आघाडीला झुकते माप असुन चर्चा करून काही ठिकाणी जागा पदरात पाडून घेणार आहेत त्या बदल्यात ते मदत करणार असल्याचे कळते. हा गट रसदेसह सज्ज असुन ताकतीने मैदानात उतरला आहे.
काही नाराज शिवसैनिक, भाजप पक्षासह इतर पक्षातील समविचारी पदाधिकारी यांची ‘मोट’ बांधून निवडणुकींना सामोरे जाण्याची रणनिती असुन धोरण ठरले आहे. शिवसेना भाजप युती झाल्याचा दावा दोन्ही बाजूच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असुन या कथित युतीला शिवसैनिकांचा विरोध आहे. शिवसैनिक व पदाधिकारी यांना डावलून युती केल्याने काही नाराज शिवसैनिक यांनी ‘यशवंत सेनेचा’ मार्ग निवडला आहे तर काही शिवसैनीकांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेत 55 जागा असुन भाजप सेना युतीत जागा वाटपात सन्मान जनक जागा वाटप झाले नसल्याचा आरोप आहे. भुम परंडा वाशी येथे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात भाजपसह सर्व पक्ष एकत्र आले आहेत तर उमरगा व लोहारा येथेही चित्र स्पष्ट झाले नाही. अश्या गोंधळाच्या स्थितीत नाराज शिवसैनिक, उमेदवारी न मिळालेले भाजपसह इतर पक्षातील इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांनी मोट बांधली असुन ‘यशवंत सेना’ याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपला धडा शिकवण्यासाठी हा पर्याय व मार्ग असल्याची त्यांची भुमिका आहे. शिवसेनेचे नेते मॅनेज झाले तरी कार्यकर्ते झुकणार नाहीत अशीच भुमिका आहे. उमेदवार अर्ज छानणी नंतर चित्र स्पष्ट होणार असुन 27 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने तो पर्यंत वाटाघाटी केल्या जाणार आहेत.












