धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील मुंबई येथील आरोपी अतुल अग्रवाल याला धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. अग्रवाल याला या गुन्ह्यात आरोपी करण्या इतपत पर्याप्त पुरावे नसल्याचे निरीक्षक कोर्टाने नोंदविले असल्याची माहिती ऍड अंगद पवार यांनी दिली. पोलीस तपासात समोर आलेले पुरावे, कागदपत्रे व ऍड अंगद पवार यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जामीन मंजुर केला.
अग्रवाल याला मुंबईतील मीरा भाईंदर येथून अटक केल्यानंतर त्याला 2 वेळेस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर त्याची धाराशिव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. तुळजापूर ड्रग्ज तस्करीतील मुख्य संशयित आरोपी वैभव गोळे व नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी गेली 10 महिन्यापासुन फरार असुन ते पोलिसांना गुंगारा देत आहेत, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 39 झाली असुन त्यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी 14 आरोपी मर्यादित चार्जशीट कोर्टात पाठवले होते त्यानंतर तपास सुरूच आहे, ड्रग्ज तस्करीतील आरोपी संगीता गोळे व संतोष खोत या 2 आरोपीच्या जबाबात, ते अतुल अग्रवाल याच्याकडुन अनेक वर्षापासुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याची कबुली दिली होती त्यानंतर अग्रवाल याचे नाव समोर आले.
पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर तपास करीत आहेत.












