नियोजन कोलमडले – उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा
खासगी रुग्णालयात व औषधी दुकानातील साठा संपला – अनेक गंभीर रुग्णांना इंजेक्शन मिळेना
उस्मानाबाद : समय सारथी
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधेचे व लागणाऱ्या औषध साठ्याचे नियोजन पुरते कोलमडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असुन खासगी रुग्णालयात व औषधी दुकानातील साठा संपला असल्याने अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळेना झाल्याने त्यांची स्तिथी तासागणिक बिकट होत चालली आहे मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासन व प्रशासकीय यंत्रणा म्हणावी तशी कार्यान्वित झालेली दिसत नाही. अनेक गंभीर रुग्णांना व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची स्तिथी बिकट होत चालली आहे तर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक यांची मोठी धावपळ होत असून शेजारील लातूर , सोलापूर जिल्ह्यातून देखील रेमडीसिवीर इंजेक्शन मिळेना झाले आहे. कोरोना झालेल्या एका रुग्णाला किमान 5 ते 6 डोस/ इंजेक्शन लागतात मात्र एकही डोस मिळेना झाला आहे.
मागील वर्षी म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेतही रेमडीसिवीर इंजेक्शन बाबत तुटवाड्याची अशीच स्तिथी झालेली असताना त्यातून प्रशासनाने आवश्यक तो बोध घेतलेला दिसत नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली होती त्यानुसार औषधांचे नियोजन व साठा करणे गरजेचे होते मात्र तसे प्रयत्न झालेले किंवा होताना दिसत नाहीत. अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) ही बाब अजूनही गंभीरपणे घेतलेली दिसत नाही. आता कुठे दुसऱ्या लाटेची सुरुवात असताना ही स्तिथी आहे त्यामुळे आगामी काळात रुग्ण संख्या वाढत चालल्याने काळ आणखी बिकट होणार आहे त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे व पर्याप्त साठा उपलब्ध केला पाहिजे.
कोणी रेमडीसिवीर देता का ? अशी म्हणण्याची वेळ आता आली असून आगामी वाटचाल बिकट आहे. या स्तिथीवर जिल्हाधिकारी व आमदार लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन पर्याप्त साठा कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 343 नवीन रुग्ण सापडले तर 153 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239
30 मार्च – 242
31 मार्च – 253
01 एप्रिल – 283
02 एप्रिल – 292
03 एप्रिल – 343