अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद – जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी काढले आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आठवडी बाजार, बाजारपेठ व मॉल्स हे बंद राहतील असेल आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. ब्रेक द चेन या मोहिमेत जिल्हाधिकारी यांनी आदेश जरी केले असून यात अत्यावश्यक सेवा दुकाने वगळता सर्व आस्थापना दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंदिरे धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद राहतील.
उस्मानाबाद जिल्हयात सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत संचारबंदी लागू राहील व या काळात ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असेल. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास बंदी असेल. संचारबंदी व वीक एन्ड लॉक काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहतील परंतु या दुकानात काम करणाऱ्या सर्वाना दर १५ दिवसांना आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक असणार आहे. खासगी व सार्वजनिक वाहतूक ही सोमवार ते शुक्रवारी पर्यंत ठरवून दिलेल्या आसन क्षमतेनुसार सुरु राहील मात्र शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरु राहील.
रेस्टोरेंट बार हॉटेल हि बंद राहणार असून फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहे. हेअर सलूनची दुकाने, ब्युटी पार्लर बंद राहतील. शाळा महाविद्यालये बंद राहतील तसेच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम बंदी असेल. सिनेमागृह, नाट्यगृह, वॉटर पार्क, जीम , चहा पानटपरी बंद राहतील.
अत्यावश्यक सेवेत रुग्णालये, औषधी दुकाने, ऑप्टीकल दुकाने, किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी, मिठाई, खाद्य, चिकन, मटण व अंडी दुकाने यांचा समावेश आहे तर कृषी संबंधित सर्व दुकाने, आधार केंद्र, पार्सल सेवा, पेट्रोल पंप, गॅस, पंक्चर, प्रसार माध्यम छापखाने व कार्यालय यांचा समावेश असणार आहे. ही दुकाने वगळता इतर दुकाने आस्थापना या बंद राहतील. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा,डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा व फळविक्रेते यांचा देखील अत्यावश्यक सेवेत नव्याने समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेले हे आदेश ५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान लागू राहतील.
ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश प्रसिद्ध करण्यात आले . खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणार्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.
सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स,रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व वकिलांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक) ज्या व्यक्ती रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल. औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ तर सकाळी ७ या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल. परीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री ८ नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल. घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री ८ नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल असे राज्य सरकारने म्हटले आहे.