तुळजाभवानी मंदीर परिसरातील दुकाने सर्रास उघडी – मुख्यमंत्री यांच्या ब्रेक द चेन आदेशाचे उल्लंघन
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना संसर्ग वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन मोहिमे अतंर्गत कडक निर्बंध घातले असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर परिसरातील अनेक दुकाने सर्रास उघडी असून अनेक भाविक, व्यापारी व पुजारी हे विनामास्क फिरत होते. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत आहे.
तुळजापूर येथे मुख्यमंत्री यांच्या आदेशाला येथील दुकानदार व व्यापारी यांनी केराची टोपली दाखवली असून पूजेचे साहित्य विक्रीसह चहाची दुकाने उघडी असून तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अनेक भाविक व्यापारी हे विनामास्क वावरत असून लहान मुले ज्येष्ठ नागरीक असलेले भक्त तुळजापुरात खुलेआम फिरत आहेत मात्र नगर परिषद , तहसीलदार , पोलीस विभाग व मंदिर संस्थान प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे तुळजापूर येथे मुख्यमंत्री यांच्या ब्रेक द चेन मोहीमेला सुरुंग लागला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आठवडी बाजार, बाजारपेठ व मॉल्स हे बंद राहतील असेल आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत मात्र त्याची स्थानिक प्रशासनाकडून अंमलबजाणवी होताना दिसत नाही.उस्मानाबाद जिल्हयात सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत संचारबंदी लागू राहील व या काळात ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असेल. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास बंदी असेल. संचारबंदी व वीक एन्ड लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येने चारशेचा आकडा पार केला. काल सर्वाधिक नवीन 423 रुग्ण सापडले व 2 जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णाची संख्या 2 हजार 522 आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 64 हजार 172 नमुने तपासले त्यापैकी 22 हजार 128 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 17.15 टक्के आहे. जिल्ह्यात 18 हजार 947 रुग्ण बरे झाले असून 85.62 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 604 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.73 टक्के मृत्यू दर आहे.