गांजा तस्करी – धाराशिव जिल्ह्यातील 6 जणांना तेलंगणा येथे अटक – उद्योजक,पोलीस हेडकॉनस्टेबलचा समावेश
धाराशिव – समय सारथी
गांजा तस्करीचा पर्दाफाश तेलंगणा पोलिसांनी केला असुन धाराशिव जिल्ह्यातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. यात भुम येथील एक उद्योजकासह परंडा येथील पोलीस हेडकॉनस्टेबलचा समावेश आहे. गांजा रॅकेटचा मास्टर माईंड भुम येथील दत्ता नावाच्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील सिलेरू येथून गांजा घेऊन महाराष्ट्रात आणला जात असे. या एका डीलमधुन आरोपीना 34 लाख मिळत असत त्या पैशाच्या मोहातून हे गांजा तस्करी रॅकेट सुरु केले होते.
आंध्रप्रदेश या राज्यातून 3 हजार रुपये किलो या दराने गांजा खरेदी करुन तो महाराष्ट्रात 20 हजार रुपये किलो दराने पोहच केला जात होता. तब्बल 200 किलो गांजासह 2 कार व 6 आरोपीना पोलिसांनी चौटूप्पल येथे अटक केली आहे. आरोपीनी गुन्ह्यांची कबुली दिली असुन ते ही तस्करी त्यांचे ऐश व चैनेसाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी करीत होते. यापूर्वी आरोपीनी 2 वेळेस याचं मार्गाने तस्करी केल्याचे मान्य केले असुन गाडीच्या डीग्गीत गांजा ठेवून तस्करी केली जात होती.
पुणे येथील विवेक मोहनराव हावले, बार्शी येथील गणेश मारुतीराव धुमाळ, भुम शहरातील सचिन सुरेश गाडे, ऑइल एजन्सी उद्योजक संतोष भारत बोराडे, परंडा येथील पोलीस हेड कॉनस्टेबल सम्राट सुरेंद्र माने व बिल अशोक माणिक यांना पोलिसांनी गांजा तस्करी करताना नाकाबंदी करीत रंगेहात पकडले असुन त्यांच्या विरोधात NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशाने या सर्वांची रवानगी नलगोंडा जिल्हा कारागृहात केली आहे.
4 जुलै रोजी पहाटे 6 च्या सुमारास या आरोपीना गांजा तस्करी करताना पकडले असुन हे सर्वजण 2 वेगवेगळ्या गाड्यात 30 जुन रोजी भुम येथून गेले होते. गांजाचे 100 पॉकेट म्हणजे 200 किलो गांजा त्यांनी 6 लाख रुपये देऊन खरेदी केले व पोलिसांना संशय येऊ नये यासाठी ते तेलंगणा येथील गाडीचे बोगस नंबर प्लेट गाडीला लावत होते मात्र पोलिसांनी पाळत ठेवून त्यांना पकडले. प्रत्येक गाडीत 2 किलो गांजाचे 50 पॉकेट, बोगस नंबर प्लेट व इतर साहित्य पकडले आहे.
दत्ता नावाच्या व्यक्तीसाठी हे सर्वजण तस्करी करुन गांजा महाराष्ट्रात आणून देत असतं, हा दत्ता कोण ? त्याचे काळे कारनामे काय आहेत ? याचा तपास पोलीस करीत आहेत. 3 हजार किलोने गांजा केशवकडुन घेऊन तो 20 हजार किलोने भुम येथील दत्ता याला देत असत, दत्ता व केशव हे दोघेही फरार असुन पोलीस शोध घेत आहेत. गाडी क्रमांक MH 15 ES 5550 व MH 16 कसा 0318 या गाडीतून हे तस्करी करीत होते.
रचकौडा विभागाचे पोलीस कमिशनर डी एस चौहान, सहायक पोलीस कमिशनर वाय मोगलायह यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणा पोलीस या रॅकेटचा तपास करीत आहेत. धाराशिव पोलिसांना या गांजा तस्करी व आरोपी अटकेबाबत कळविले असुन मोठे रॅकेट बाहेर येण्याची शक्यता आहे.