रेमडीसीवीर इंजेक्शन पुरवठाचा मास्टर प्लॅन – आयुक्त काळे यांचे 7 कंपन्यांना लेखी आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असून तो कमी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी 7 कंपन्यांना लेखी पत्र देऊन इंजेक्शन पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. 10 एप्रिल ते 30 एप्रिल व नंतर कशा स्वरूपात इंजेक्शन पुरवठा करायचा याचा प्लॅन आयुक्तांनी दिला आहे त्यानुसार राज्यात 10 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान 36 लाख 40 हजार रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असून यामुळे रूग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
आयुक्त काळे यांनी जुब्लियंट जेनिरीक्स लिमिटेड , सिपला , डॉ रेड्डी , सन फार्मा, हेट्रो हेल्थ केअर,झायडस हेल्थ व मायलॅन या 7 औषधी कंपन्यांना पत्र लिहून इंजेक्शन उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 10 ते 14 एप्रिल दरम्यान प्रतिदिन 22 हजार इंजेक्शन प्रति कंपनी असे 7 लाख डोस , 15 ते 19 एप्रिल दररोज 22 हजार इंजेक्शन असे 1 लाख 54 हजार , 20 एप्रिल ते 24 एप्रिल दररोज 30 हजार इंजेक्शन असे 2 लाख 10 हजार , 25 ते 29 एप्रिल प्रतिदिन 32 हजार असे 2 लाख 24 हजार इंजेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत अश्या प्रकारे 36 लाख 40 हजार इंजेक्शन उपलब्ध होतील व त्यानंतर 30 एप्रिलच्या पुढे या 7 कंपन्यांना प्रतिदिन 35 हजार प्रमाणे पुरवठा करायचा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याची स्तिथी
उस्मानाबाद जिल्ह्यात काल काही इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला होता मात्र तो अवघ्या काही तासात संपला आहे. आज जवळपास 1 हजार पेक्षा जास्त साठा मिळणे अपेक्षित आहे असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे विलास दुसाणे यांनी सांगितले त्याच बरोबर काळाबाजारी रोखण्यासाठी इंजेक्शन साठाचे ऑडिट करणार असून यंत्रणा लक्ष ठेवून आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जवळपास 1200 इंजेक्शन साठा उपलब्ध आहे.
कोरोना संसर्गात उपचारासाठी महत्वाचे मानल्या जाणाऱ्या रेमडीसेविर इंजेक्शनसह अन्य औषधांच्या वापराबाबत व ती तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महत्वपुर्ण लेखी आदेश जारी केले आहेत. सद्यस्थितीत रेमडीसीवीर या औषधांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील रेमडीसीवीरचा पुरवठा खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरज आहे का ? ते पडताळून करण्यात येणार आहे. रुग्ण उपचार घेत असलेले रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत येत असल्यास जिल्हा रुग्णालयातून मोफत इंजेक्शन देण्यात येईल तर खासगी रुग्णलय त्या योजनेत येत नसल्यास जिल्हा रुग्णालयातून उसनवारी तत्वावर ३ दिवसासाठी देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.