जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल – रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण
21 वर्षाची कोरोना बाधीत युवतीचा गृहविलगीकरणात मृत्यू , कारणांचा शोध सुरू
जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा ? अनेकांना बाहेरून आणावे लागत आहेत गोळ्या
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या दररोजच्या आकड्याने 600 रुग्णांचा टप्पा पार केला असुन जिल्ह्यात 3 हजार 902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 15 दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन त्याचा ताण आरोग्य यंत्रणावर पडत आहे. मागील वर्षीच्या कोरोना लाटेपेक्षा यावर्षीच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण भरती वाढत असल्याने ज्या रुग्णाची तब्येत स्थीर झाली आहे अशा काही रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये निगराणीखाली पाठवुन रिकाम्या झालेल्या बेडवर नवीन रुग्ण भरती करून सध्या जिल्हा रुग्णालयाची मदार अवलंबून आहे. जिल्हा रुग्णालयात शनिवारी काही काळ बेड उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेची मोठी धावपळ झाली तर रुग्णाची गैरसोय झाली.
जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ही स्तिथी सारखीच आहे. उस्मानाबाद तालुका व शहर कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने शहरातील अनेक रुग्णालये फुल्ल झाली आहेत त्यामुळे अनेक रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. एकट्या उस्मानाबाद शहरात 300 पेक्षा जास्त रुग्ण रोज सापडत आहेत तर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. सध्या कोरोनाचा पीक ( सर्वोच्च टोक ) असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील अनेक आव्हाने आहे , उपलब्ध साधने व यंत्रणेच्या बळावर ते कोरोनाशी लढा देत आहेत मात्र त्यांना नागरिकांची साथ हवी आहे. आजही अनेक नागरिक विनामास्क विनाकारण फिरत असून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळणे व प्राथमिक लक्षणे दिसल्यावर ती अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे आहे तरच कोरोना रुग्णाची वैद्यकीय स्तिथी बिकट होणार नाही पर्यायाने रुग्णांचा जीव वाचेल व सर्वांची धावपळ उडणार नाही. कोरोना संसर्ग रोखणे व तो आटोक्यात आणणे हे नागरिकांच्या हातात आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची व कुटूंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
जिल्हा शासकीय रुगणालयात रेमडीसीवीरचा पर्याप्त साठा उपलब्ध असल्याने व तो गरजेनुसार खासगी रुग्णालयातील रुग्णांना दिला जात असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे तर ऑक्सिजन सिलेंडरचा काही वेळा होणार तुटवडाही प्रशासन शेजारील जिल्ह्यासह इतर राज्यात समन्वय साधून दूर करीत आहे.
उस्मानाबाद शहरातील एक 21 वर्षाची कोरोना बाधीत युवतीचा गृहविलगीकरणात असताना ( होम क्वारनटाईन ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुलीला दोन दिवसांपूर्वी कोरोना झाला त्यानंतर तिची तब्येत स्थिर असल्याने तिला घरी उपचार करण्यासाठी पाठविले होते मात्र तिचा घरीच मृत्यू झाला. तिला शासकीय रुग्णालयात आणल्यावेळी ती मयत असल्याने ही बाब जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गांभीर्याने घेतली असुन तिचे पोस्ट मार्टम करण्याचे आदेश जिल्हा शासकीय रुग्णालयास दिले आहे. तब्येत व वैद्यकीय स्तिथी चांगली असताना अचानक तरुणीचा मृत्यू कसा झाला ? या कारणांचा शोध सुरू असून रिपोर्ट आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत त्यामुळे लोकांनी तर्कवितर्क न लावता अफवांवर विश्वास ठेवू नये.
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना झाल्यानंतर प्राथमिक लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा गृह विलगीकरनात ठेवले जाते त्यावेळी त्यांना तपासणी करून कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक शक्तिवर्धक व रोगप्रतिकारक औषधे दिली जातात मात्र त्यातील बरीच औषधे गोळ्या या शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत त्यात व्हिटॅमिन सी , झिंक , व्हिटॅमिन डी , पित्ताची पॅन डी या गोळ्याचा समावेश आहे त्यामुळे रुग्णांना त्या मेडिकलमधून खरेदी कराव्या लागतात. शासकीय रुग्णालयातून लक्षणे नसलेल्या रुग्णांना केवळ कॅल्शियम व पॅरासीटेमॉल दिले जात असल्याचे दिसते. कुटुंबातील अनेक सदस्य कोरोना बाधित येत असल्याने गोरगरीब रुग्णांना हा आर्थिक खर्च परवडणारा नाही त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन आवश्यक साठा उपलब्ध करून तो किमान गरजू रुग्णांना तरी वितरीत करून द्यावा अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली असताना व त्यानुसार औषधी सामुग्री व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे लेखी आदेश असतानाही अनेकांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्याने नियोजन कोलमडले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्तिथी –
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 71 हजार 450 नमुने तपासले त्यापैकी 24 हजार 624 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 18.66 टक्के आहे. जिल्ह्यात 20 हजार 095 रुग्ण बरे झाले असून 81.45 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 628 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.53 टक्के मृत्यू दर आहे.