एकमताने निर्णय – धाराशिव जिल्हा डॉल्बीमुक्त करण्याचा संकल्प
जिल्हाधिकारी ओम्बासे व पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
धाराशिव – समय सारथी
कोणत्याही सण, उत्सव व जयंतीसह धार्मिक, व्यक्तीक कार्यक्रम, लग्न सोहळ्यात डॉल्बी न वापरण्याचा निर्णय धाराशिव येथे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. धाराशिव जिल्हा डॉल्बीमुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प केला असुन एकमताने निर्णय घेतला. डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्य, पोलीस पथकाचे वाद्य वापरण्याचा निर्णय झाला शिवाय जयंती, उत्सव, सण साजरे करताना वाद्य वाजविण्याच्या वेळा ठरविण्यात आल्या. ध्वनीप्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या नुकसानीचे परिणाम व कायद्याचे पालन करणे गरजेचे असल्याने यापुढे डॉल्बीचा आवाज वाढल्यास दंडासह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, डॉ सचिन देशमुख, डॉ विशाल वडगावकर,डॉ स्वप्नील यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव,दिलीप पारेकर, उस्मान शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तर विश्वास शिंदे,प्रकाश जगताप, बाळासाहेब शिंदे, मसूद शेख, धनंजय शिंगाडे, विशाल शिंगाडे, विष्णु इंगळे, राजाभाऊ बागल,सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, मैनोद्दीन पठाण, प्रभाकर लोंढे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थितीत होते.
डॉल्बीच्या आवाजामुळे लहान मुले, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, हृदय रोगासह अन्य आजार असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कमी ऐकू येणे, कायमचे नुकसान, धडकी भरणे, भीती वाटणेसह मानसिक आजार बळावू शकतात. काही वेळा मृत्यू होऊ शकतो, 20-30 सेकंद पेक्षा जास्त वेळ मोठा आवाज ऐकला तर कायमचा बहिरेपणा येऊ शकतो त्यामुळे डॉल्बी आवाज घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
60 डेसिबल आवाज ऐकू शकतो मात्र डॉलबीचा आवाज 100-140 पर्यंत असतो. मिरवणूक जयंतीमध्ये तरुणाचा सहभाग जास्त असल्याने तरुण वयात धोके निर्माण होतात असा सुर या बैठकीत उमटला. आता पर्यंत कडक कारवाई केली जात नव्हती मात्र यापुढे ठोस पावले उचलली जातील.धाराशिव जिल्ह्याला सण उत्सव साजरे करण्याचा वारसा चांगला आहे, एक गाव एक गणपतीसारखे अनेक उपक्रम राज्यभर गाजले तोच आदर्श कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जयंतीत नाचणारी नव्हे तर पुस्तके व विचार वाचणारी माणसे तयार करायची आहेत असे सांगत एक गाव एक मिरवणूक संकल्पनासह पारंपरिक वाद्य असलेले ढोल पथक, लेझीम, झाज पथक, तुतारी, हलगी यांना एक लय व ताल असतो त्यामुळे वातावरण प्रसन्न व धार्मिक बनते शिवाय ध्वनीप्रदूषण होत नाही त्यामुळे त्याचा वापर करावा. पारंपरिक वाद्यमुळे जुनी परंपरा, संस्कृती जतन होते शिवाय कलाकार यांना रोजगार सुद्धा मिळू शकतो. रुग्णालय, शाळा यासारख्या ठिकाणी शांतता झोन व प्रतिबंधीत क्षेत्र असणार आहे, यापुढे नियम मोडल्यास कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला.
निर्धार करुन कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. धाराशिव जिल्ह्याला कोणत्याही जातीयवादाची पार्शवभूमी नाही. डॉल्बीसारखा प्रकार कोणत्याही महापुरुषांच्या विचाराला साजेसा नाही.आनंद घेण्यासारखा डॉल्बीत काही नाही उलट पारंपरिक वाद्य वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले.
कोरोना काळात अनेक सण, उत्सव बंद होते त्यामुळे नंतर ते जल्लोषात साजरे केले गेले शिवाय निवडणुकीच्या तोंडावर डॉल्बी वापर वाढल्याचा सुर होता. नियम करायचा असेल तर सर्वांना समान करावा असे मत विविध मान्यवरांनी मांडले.
पोलीस दलाच्या खांद्यावर अद्याप महाराष्ट्र पोलीस लिहलेले आहे, कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. नियम सर्वांना समान राहतील. कायदा व सुव्यवस्था राखताना कोणत्याही स्तिथीत तडजोड केली जाणार नाही. कायद्यात राहू तर फायद्यात राहू असे सांगत नियम मोडणाऱ्याना उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी तंबी दिली.