धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवाल याला जेरबंद करण्यात अखेर धाराशिव पोलिसांना यश आले असुन त्याला कोर्टाने 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तो गेली 10 महिन्यापासुन फरार होता त्याला अटक केल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजवर ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 39 झाली असुन त्यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. ड्रग्ज तस्करीत मुख्य आरोपी वैभव गोळे व इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ठाकुर व गोळे कधी सापडतात हे पाहावे लागेल. पोलिसांनी 14 आरोपी मर्यादित चार्जशीट कोर्टात पाठवले होते त्यानंतर तपास सुरूच आहे, तपासाअंती पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
ड्रग्ज तस्करीतील आरोपी संगीता गोळे व संतोष खोत या 2 आरोपीच्या जबाबात, ते अतुल अग्रवाल याच्याकडुन अनेक वर्षापासुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याची कबुली दिली होती त्यानंतर अग्रवाल याचे नाव समोर आले.
धाराशिव पोलिसांनी अग्रवाल याला मुंबई येथील मीरा भाईंदर येथून अटक केली. अग्रवाल हा मुळचा राजस्थान येथील रहिवासी असुन तो गेली जवळपास 20 वर्ष मुंबईत स्थायीक आहे. तो मीरा भाईदर या भागात एका लॉंड्रीच्या दुकानाच्या आडून ड्रग्जचा काळाबाजार करीत होता. 2004 पासुन त्याच्यावर ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद आहेत.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी अतुल अग्रवाल याला पोलिस कधी अटक करणार असा सवाल करीत मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले होते तर आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला होता त्यानंतर अतुल अग्रवाल प्रकरण राज्यभर गाजले होते.
पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर यांनी तपास पथक गठित केले होते. यात पीएसआय प्रदीप टेकाळे, पोलिस हवालदार सूरज नरवडे आणि गोपाळ सलगर यांचा समावेश होता.सपोनि गोकुळ ठाकूर ठाकूर पुढील तपास करत आहेत.









