1 हजारांना पुजेचे ताट, पार्किंग भाविकांची लुट – दिले आदेश
धाराशिव – समय सारथी
शनैश्वर मंदीर परिसरात काही दुकानदाराकडुन पुजेचे ताट व पार्किंगच्या नावाखाली भाविकांच्या होत असलेल्या लुटीचा अनुभव नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांना पाहणी करून आल्यानंतर त्यांनी महत्वाचे आदेश दिले. शनि मंदिर परिसरात डॉ गेडाम यांनी खासगी गाडीने एन्ट्री करीत दुकाने, पार्किंग, दर्शन व्यवस्था अश्या वेगवेगळ्या ठिकाणी पायी जात भेटी दिल्या. ओळख उघड होऊ नये यासाठी त्यांनी चेहऱ्यावर मफ्लर घातले व सामान्य भाविकाप्रमाणे पाहणी केली. यात अनेक त्रुटी समोर आल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाचा कारभार प्रशासक नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. डॉ गेडाम यांनी वेशभूषा बदलून सामान्य भाविकासारखे तिथे जात पूजा साहित्य खरेदी विक्रीचा अनुभव घेतला व भाविकाशी चर्चा केली. अवाजवी दराने पूजा साहित्य विकले जात व 1500 ते 1700 रुपयापर्यंत पार्किंग चार्ज आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेडाम यांनी सर्व विक्रेत्यांना जाहीर दर फलक लावण्याचे आदेश दिले.
शिर्डी व शनि शिंगणापूर या भागात असे प्रकार वाढले असुन त्यांना आता या निमित्ताने आळा बसणार आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असुविधाचा आभाव असुन पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहसह अन्य मुलभुत सुविधा इथे नाहीत. डॉ गेडाम यांच्या नियुक्तीने भाविकात आशा निर्माण झाली आहे. गेडाम यांच्या मफ्लर स्टाईलचा धसका घेतला आहे.
डॉ गेडाम यांनी देवस्थानच्या विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. तत्पूर्वी सकाळी त्यांनी शासकीय लवाजमा बाजुला ठेवत सामान्य भाविकासारखे जात पूजा साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देत पूजेसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी काही दुकानदार 1 हजार 100 रुपयांना पूजेचे ताट देत होते. पार्किंगच्या नावाखाली लुट होत असल्याच्या तक्रारी काही भाविकांनी त्यांच्याकडे केल्या.
जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यासह अधिकारी बैठकीना उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी मंदीर संस्थानच्या कार्याचा आढावा घेतला, भाविकांच्या सुविधासाठी प्राधान्य देत बदल सुचविले. सुधारणार न केल्यास कारवाईचा इशारा दिला.
डॉ प्रवीण गेडाम हे धाराशिव जिल्हाधिकारी असताना त्यांनी तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष म्हणुन तुळजाभवानी मंदिरात अमूलाग्र बदल केले. त्यांच्या निर्णयामुळे तुळजाभवानी मंदिरात सिंहासन पेटीत सोने चांदी जमा व्हायला सुरुवात झाली तसेच मंदिराच्या मठाना विविध सेवेसाठी दिलेल्या जमिनीचा विषय गाजला. दर्शन व्यवस्थेसह अन्य निर्णय घेल्याने भाविकांची मोठी सोय झाली.
लटकू पद्धत बंद करणार
लटकूंबाबत खासगी वाहनतळ व देवस्थान वाहनतळ दुकानदारांची आयुक्त डॉ. गेडाम यांनी जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, लटकुमुळे भाविकांना मोठा ग्रास होत आहे. लटकू पद्धत बंद केली जाईल. पूजा साहित्य खूप जादा दराने विकले जात असून, याबाबत सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यासाठी सर्वांनी पूजेच्या दराचे मोठे फ्लेक्स लावा. भाविकांना सक्ती करू नका, अशा तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
नाशिक कुंभमेळ्याची डॉ गेडाम यांच्यावर जबाबदारी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक आहे, जो दर 12 वर्षांनी गोदावरी नदीच्या काठावर होतो. कुंभमेळा विकास प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ गेडाम असुन कुंभमेळ्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 26 रोजी होईल आणि 24 जुलै 28 पर्यंत चालेल, ज्यात अनेक शाही स्नानांचे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.










