शांतता, संवाद आणि शिस्त ही त्रिसूत्री – नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
धाराशिव – समय सारथी
धाराशिव हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या शहरात चोरी, मारामारी व अवैध धंदे वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र धाराशिव शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी स्वीकारताच शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन संपूर्ण शहरातील गल्ल्यांची पाहणी केली.
बेशिस्त बनलेल्या शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व सर्वांमध्ये पोलीस व पोलिस खात्याचा विश्वास दृढ होण्यासाठी दराडे यांनी योग्य पावले उचलली. त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे नियोजनबद्ध काम करीत खाकी वर्दीत दडलेली माणुसकी व कायद्याचा धाक काय असतो ? हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे शहरात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांनी सहा महिन्यांपूर्वी पदभार घेतला त्याचवेळी कायदा व सुव्यवस्था राखत लागलीच गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, अण्णाभाऊ साठे जयंती, ईद-ए-मिलाद आणि नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकी सुरळीतपणे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू न देता यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. वरील उत्सव व निवडणूक मिरवणुका, उत्सव शांततेत पार पाडण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वेळोवेळी शांतता समितीच्या बैठका घेतल्या गेल्या. या बैठकींच्या माध्यमातून विविध समाजघटकांशी थेट संवाद साधत गैरसमज दूर करण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आले. विशेष म्हणजे नागरिकांशी समन्वय साधण्यावर भर देत पोलिसांप्रती असलेली प्रतिमा सुधारण्याचे महत्त्वाचे काम झाले आहे. तसेच सात वर्षांपासून प्रलंबित असलेले मुद्देमाल प्रकरणे निकाली काढत प्रशासनिक कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला आहे.
शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करून संवेदनशील ठिकाणी सतत लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे संभाव्य धोके व उद्भवणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीवर वेळीच उपाय करण्यासह नियंत्रण मिळवणे देखील सहज शक्य झाले आहे. तर नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरही पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवत विजयी मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू न देता शहरातील वातावरण सौहार्दपूर्ण राखण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले.
चौकट
धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करीत कायदा व सुव्यवस्था रुळावर आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिसांच्या भूमिकेबाबत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे शांतता, संवाद आणि शिस्त या त्रिसूत्रीवर आधारित पोलिसिंगमुळे शहरात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.











