राक्षसी आनंद घेतला, जनतेने जागा दाखवत माज उतरवला
धाराशिव – समय सारथी
नगर परिषद निवडणुकीच्या निकालात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधता जोरदार टीका केली आहे. धमक असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून दाखवा, मल्हार पाटील नाव बदलतो असे ओपन चॅलेंज दिले आहे. माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांचा जनतेनेच उत्तर देत माज उतरवला. लोकसभेतील विजयाचा ‘राक्षसी आनंदा’ घेतला मात्र नगरपालिकेत जनतेचं उत्तर दिले. वैयक्तिक टीकेला न जुमानता जनतेचा भाजपला स्पष्ट कौल असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष नगरसेवक अमित शिंदे, दिनेश बंडगर उपस्थितीत होते.
धाराशिव शहराच्या नगरपालिकेतील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय बिकट अवस्था होती. त्यामुळे शहरवासीय परिवर्तनासाठी उत्सुक होते. शहरात काहीतरी चांगले, प्रगतशील घडावे, असे स्वप्न प्रत्येक शहरवासीय पाहत होता. याच अपेक्षेतून मायबाप जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला असून, त्या विश्वासाबद्दल आम्ही मनापासून ऋणी आहोत, असे मत मल्हार पाटील यांनी व्यक्त केले.
विरोधकांनी वैयक्तिक टीका केली असली तरी जनतेने भाजपला ठाम साथ दिली. याबाबत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, या मतदारसंघातील आमदार आणि जिल्ह्याचे खासदार सातत्याने “आमचा माज उतरवणार, भाजपच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते आणि मल्हार पाटील यांचा माज उतरवणार,” अशी भाषा करत होते. मात्र, मायबाप जनतेने त्यांचा माज मस्ती खड्डे पडलेल्या रस्त्यावर नेऊन टाकली आहे.
ज्या मस्तवालपणाने माता-भगिनींचा अपमान करण्यात आला, शहरातील नागरिक व अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि शहराची जी बकाल अवस्था खासदार-आमदारांनी निर्माण करून ठेवली होती, त्यालाच उत्तर देत जनतेने यावेळी भारतीय जनता पक्षाला प्रचंड ताकदीने निवडून दिले आहे,असेही मल्हार पाटील म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला घवघवीत यश मिळाले असून, महाविकास आघाडी किंवा उबाटासह कोणत्याही पक्षाला साधा नगराध्यक्षही निवडून आणता आलेला नाही. धाराशिव शहरात केवळ सात ते आठ ठिकाणीच विरोधकांचे नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून मायबाप जनतेने त्यांची औकात दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.
“मी या दोन्ही लोकप्रतिनिधींन खुले आव्हान देतो. भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे. धमक असेल तर जिल्हा परिषद उमेदवार निवडून दाखवा, धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मी माझे नाव बदलतो.मल्हार पाटील यांनी मशाल चिन्हाला आईस्क्रीम कोन म्हणुन पुन्हा हिनवले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष शंभर टक्के निवडून येईल. पंचायत समितीतही आम्हाला घवघवीत यश मिळेल. टीमवर्क, योग्य नियोजन आणि ताकदीने केलेल्या कामामुळे हा निकाल मिळत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांवर माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय राक्षसी आनंद खासदाराला झाला होता. मात्र त्या आनंदाला आता जनतेनेच उत्तर दिले असून, त्याची खरी औकात मायबाप जनतेने दाखवून दिली आहे, असा घणाघाती टोला मल्हार पाटील यांनी लगावला.











