धाराशिव – समय सारथी
निवडणुक निर्णय अधिकारी, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व त्यानंतर सुप्रीम कोर्ट अशी न्यायालयीन लढाई जिकंलेल्या भाजपचे शहराध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे यांचा जनतेच्या दरबारात सुद्धा विक्रमी मतांनी विजय झाला आहे. तब्बल 932 मतांच्या फरकाने अमित दिलीपराव शिंदे हे नगरसेवक पदी निवडुन आले आहेत. ते पुन्हा एकदा ‘वन साईड’ निवडुन येणारे नगरसेवक ठरले आहेत.
शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, न्यायालयात शिंदे यांचा विजय झाला त्याचं प्रमाणे जनतेच्या दरबारात सुद्धा त्यांचा विजय झाला. प्रकरण कोर्टात गेल्याने शिंदे यांच्या जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान झाले, त्यांच्या विरोधात सगळे एकवटले होते मात्र विरोधक तोंडावर पडले. शिंदे यांना 1984 मते तर प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पंडित मुंडे यांना 1052 मते पडली. शिंदे यांच्या प्रभागात भाजपच्या आकांक्षा आकाश वाघमारे यांचा सुद्धा विजय झाला.
माझा हा विजय सामान्य जनतेचा व त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा आहे. सुप्रीम कोर्टात जसा विजय झाला तसाच जनतेच्या दरबारात सुद्धा विजय झाला हा द्विगुणित करणारा आनंद आहे. मी आजवर जे समाज कार्य करीत आलो ते यापुढेही करीन. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणुन प्रभागासह शहरात विविध उपक्रम राबवून एक आदर्श प्रभाग निर्माण करण्यास प्राधान्य देईल. मी सर्व मतदार, कार्यकर्ते, हितचिंतक यांचा आभारी व ऋणी आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
नगर परिषद निवडणुकीपुर्वी अमित दिलीपराव शिंदे यांची भाजप शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. शिंदे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता व पक्ष बांधणी करीत युवकांची मोट बांधली व नगर परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले.
धाराशिव नगर परिषदेत भाजपने एकहाती स्पष्ट बहुमत मिळवल्याने शहराध्यक्ष अमित शिंदे यांची उपाध्यक्ष पदी निवड करावी अशी मागणी नगरसेवक व त्यांच्या समर्थकाकडुन व्यक्त होत आहे. शिंदे यांना 3 टर्म नगरसेवक पदाचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी नगराध्यक्ष पदासह अन्य जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली आहे. पक्ष संघटन, शहरातील समस्याची जाण व अनुभव यामुळे ते उपाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहेत.











