धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील कुलदीप मगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 8 जणांसह इतरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोळीबार व जीवे मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमानव्ये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले असुन तपास सुरु आहे. मगर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.भारतीय न्याय संहिता कलम 109 जीवे मारण्याचा प्रयत्न, कलम 189(2),191(2),191(3),190 शस्त्र अधिनियम 3 व 4, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37(1) व 37(3) अन्वये तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे करीत आहेत. सुरज नन्नू साठे, चेतन शिंदे,सागर किशोर गंगणे,शुभम साठे,शेखर किरण गंगणे,नंदू गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी यांच्यासह इतरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मगर यांच्या जबाबानुसार ते सिंदफळ येथील शेतातून काम करून लातूर रोड कडून लोहिया मार्गे घराकडे जात असताना विठाई हॉस्पीटल समोर आले. त्यावेळी समोरुन सुरज नन्नू साठे, चेतन शिंदे हे दोघे दोन मोटारसायकलवरुन विठाई हॉस्पीटल समोर आले व त्यांच्याकडे पाहून जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. त्यावेळेस त्यांचे सोबत असणारे व दबा धरुन बसलेले सागर किशोर गंगणे, शुभम साठे, शेखर किरण गंगणे, नंदू गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी, व इतर हे जवळ येवून जिवे मारण्याचे उद्देशाने धारदार शस्त्र, कत्ती, कोयत्याने मारहाण केली.
शेखर गंगणे, सागर गंगणे, सुरज साठे, चेतन शिंदे यांनी मगर यांच्या डोक्यात व पाठीवर, मानेवर कोयत्याने वार केले त्यावेळी सुरज साठे व चेतन शिंदे, सागर गंगणे, शेखर गंगणे म्हणाले की, तु विनोद पिटू गंगणेच्या विरोधात का प्रचार केला आता तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून कोयत्याने व धारदार शस्त्राने सपासप वार केले त्यावेळी गळ्यातील सोन्याची चैन खेचली. म्हणाले की तुला आता आम्ही विनोद पिटू गंगणेच्या ताब्यात देण्यासाठी घेवून जातो व त्याचे समोरच तुला संपवतो असे म्हणून उचलुन घेवुन जाण्याचा प्रयत्न केला.
डीवायएसपी निलेश देशमुख व पीआय मांजरे यांच्या गाड्या आल्यानंतर तेथे जमा झालेले विनोद पिटू गंगणे याचे कडील माणसे तेथून पळून गेली परंतु त्यातील मारहाण करणारे शुभम साठे व सागर गंगणे यांना मगर यांनी पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. निलेश मगर व धिरज पाटील हे मदतीला धावून आले त्यांनी मगर यांना तुळजापुर येथील सरकारी दवाखाना येथे नेले त्यानंतर अती रक्तस्त्राव झाल्याने ते बेशुध्द झाले व पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले.












