देशमुखी थाट – सलग 2 वेळेस अमित देशमुख यांचा उस्मानाबाद दौरा रद्द
कोरोना संकटात तरी वेळ व गांभीर्य ओळखा
काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची जनतेच्या दरबारात गोची
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा सलग 2 वेळेस तांत्रिक व अपरिहार्य कारण पुढे करीत रद्द झाल्याने त्यांच्या देशमुखी थाटावर पुन्हा एकदा चर्चा व टीका होत आहे. कोरोना संकटात उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेला आधार देण्याची गरज व समस्या सोडविणे क्रमप्राप्त असताना आघाडी सरकार मधील मंत्री येणे अपेक्षीत आहे . मंत्री अमित देशमुख यांचा 2 वेळेस अधिकृत दौरा आला मात्र तो रद्द झाल्याने काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळापासून राजकीय पाठबळ व रसद मिळत होती आताही तोच वारसा कायम आहे मात्र अमित देशमुख सुरुवातीपासून वेळेचे पालन करीत नसल्याचा अनुभव अनेकांना आहे. उस्मानाबादच्या पक्षीय व इतर अडचणी सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने अमित देशमुख यांना पालक्तव दिले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांच्या वक्तशीरपणासह अन्य बाबीमुळे लोकप्रिय व अनुकरणीय होते मात्र त्याचे पुत्र नेमके याउलट आहेत त्यांच्या थाटावर लातुरात अनेक वेळा टीकाही झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन उपलब्ध सुविधावर लढा देत आहे अश्या वेळी सरकारमधील मंत्री यांनी मनोबल वाढवून प्रोत्साहन देणे व आर्थिक निधी देणे गरजेचे आहे. मंत्री येणार म्हणून प्रशासन अनेक तयारी करते व यंत्रणा सज्ज ठेवते अश्या कामात महत्वपूर्ण प्रशासकीय वेळ खर्ची जातो त्यामुळे याचे गांभीर्य मंत्र्यांनी ओळखले पाहिजे. कोरोना संकटात यंत्रणा कामाला लागली असताना तरी वेळ पाळने अपेक्षीत आहे.
कोरोना संकट असताना मंत्री येणार म्हणून नागरिकांना समस्याचे निराकरण होईल अशी मोठी आशा असते मात्र यायचेच नसेल तर सलग 2 दिवस दौरा का आखायचा हा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यात शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असून उस्मानाबाद जिल्ह्यत शिवसेनेचे प्राबल्य असून पालकमंत्री हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत त्यामुळे त्यांची मोठी गोची होत आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचा एकही आमदार नसल्याने त्यांची मदार पक्षश्रेष्टीवर व शेजारील जिल्ह्यातील मंत्र्यांवर आहे मात्र मंत्री हुलकावणी देत येत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादीची पकड ढिली होत चालली आहे. जनतेच्या दरबारात कॉंग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना उत्तरे देताना अडचण येत आहे. गेल्या 1 महिन्यात कोरोना संकटात काँग्रेस राष्ट्रवादीचा एकही मंत्री उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला नाही.
कोरोना दुसऱ्या लाटेपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कळंब तुळजापूर येथे आले होते त्यांनी जिल्ह्यात विविध खासगी रुग्णालयाचे उदघाटन करण्यात वेळ घालवला.