कोरोना संकट मोठं आहे पण मदत कमी पडू देणार नाही
भरीव मदत – आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी घेतला आढावा
रुग्णालयात कर्मचारी भरा , औषधे घ्या निधी देतो – ड्युरा सिलेंडर भेट
उस्मानाबाद/ परंडा – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकटात नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार डॉ तानाजीराव सावंत सक्रिय झाले असून त्यांनी आज भूम वाशी परंडा व उस्मानाबाद येथे आढावा बैठक घेऊन भरीव अशी मदत केली. “संकट मोठं आहे पण मदत कमी पडू देणार नाही..” असे आश्वासन देत त्यांनी लोकांना आश्वस्त करीत दिलासा दिला.रुग्णालयात कर्मचारी भरा , औषधे घ्या स्वखर्चाने निधी देतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.सावंत यांच्या दौऱ्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून त्यांना आर्थिक रसद मिळणार असल्याने अनेक समस्या सुटणार आहेत.
माझ्या जिल्ह्यातील व मतदारसंघातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि एकाही रुग्णाला उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणूनस्वखर्चाने 5 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी येणाऱ्या काळात सुद्धा मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी असंच एकजुटीने काम केले तर आपण निश्चितपणे या कोरोना संकटातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे.
यावेळी आमदार डॉ. तानाजीराव सावंत, मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, दत्ता साळुंखे,नगरसेवक सूरज साळुंके, गौतम लटके व विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तहसील कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक, उपजिल्हा रुग्णालय व कोरोना सेंटरला भेट देत आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी आढावा घेतला. तहसील कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांनी मदतीची वाट न पाहता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना राबवा खर्च मी स्वतः भैरवनाथ शुगर मिल च्या वतीने करतो असा शब्द व सूचना संबंधितांना त्यांनी दिल्या.शासनाकडून मदत मिळेल याची वाट न पाहता काम सुरू ठेवा असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी गावातील प्रत्येक ग्रामसेवकांनी आपआपल्या गावात फीरून जनजागृती करणे आवश्यक असुन यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी तसे आदेशच काढावे अशा सुचना आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी तहसीलदार कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या. तसेच आज पर्यंत कोरोना वाढू नये यासाठी तालुक्यातील अधिकारी यांनी काय उपाय योजना केल्या माहीती आमदार सावंत यांनी जाणुन घेतल्या. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती दत्तात्रय साळुंके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, विकासरत्न डॉ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे,गौतम लटके, मेघराज पाटील,शिवसेना नगरसेवक रत्नकांत शिंदे, वैभव पवार,धिरज ठाकूर,तहसीलदार अनिलकुमार हेळकर, मुख्याधिकारी दिपक इंगोले, प्रभारी गटविकास अधिकारी किशोर अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जहूर सय्यद, तालुका वैद्यकीय अधिकारी अबरार पठाण, पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे, उपकार्यकारी अभियंता अमेय वनारी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेने वर पडत असलेला ताण पाहता वैद्यकीय अधिकारी यांनी रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरावी. या कर्मचाऱ्यांचा पगार भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून आठवड्याला गेला जाईल. रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी लागणारी औषधे खरेदी करा यासाठी रोख निधी देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील स्वतःचा जीव धोक्यात घालून जनजागृती करण्याचे काम करणाऱ्या तालुक्यातील ९४ आशा कार्यकर्ती यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तात्काळ रोख स्वरूपात मानधन देण्याच्या संबंधित यांना सुचना केल्या.
*लसीकरण , ऑक्सिजन , इंजेक्शनबाबत चर्चा तर उत्कृष्ट आहार देण्याच्या सूचना*
वाशी तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कोविड केअर सेंटर, वाशी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली, व तहसील कार्यालय, वाशी येथे आढावा बैठक घेतली. संभाव्य रुग्णांची संख्या वाढवणार हे गृहीत धरुन आरोग्य यंत्रणेची तयारी ठेवा. त्याचबरोबर तालुक्यातील लसीकरणाचा वेग कायम ठेवावा. १ मे २०२१ पासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. यासाठी नियोजन केले जावे, अश्या सूचना यावेळी केल्या.
भूम तालुक्यातील कोरोना विषाणूच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भूम मधील शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना आज भूम येथे दिल्या. त्याचबरोबर भूम तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचनाही दिल्या यावेळी भूम शहर आणि परिसरातील कोरोना परिस्थिती, उपलब्ध बेड संख्या, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिव्हीर इंजेक्शन पुरवठा, लसीकरण मोहीम याचा आढावा घेतला.याचबरोबर होम आयसोलेशन ऐवजी जास्तीत जास्त रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. यावेळी भूम ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला, रुग्णालयामधील डॉक्टर्स बरोबर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
सर्वच कोविड सेंटर मध्ये रुग्णांना दिले जाणारे जेवण चांगल्या दर्जाचे असावे असे मत आमदार सावंत यांनी व्यक्त केले व तशा सूचना दिल्या, चांगला आहार दिला तरंच रुग्ण उपचारास चांगला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर बरे होऊन घरी जातील, यासाठी गोलेवाग ता.भूम येथील कोविड सेंटर मध्ये तहसीलदार व अधिकारी यांच्या समवेत समक्ष जाऊन पाहणी केली. येथे उपचार घेत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला, अडचणी जाणून घेतल्या व त्या त्वरित सोडविण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
.