कोरोना लस वाचवा पॅटर्न संशयात – आकडेवारीचा खेळ ?
100 पैकी 101.84 टक्के गुण घेऊन प्रशासन पास – लसीचा एक थेंब वाया नाही
उस्मानाबादचे कौशल्यपूर्ण नियोजन देणार लसीकरणाला कलाटणी ?
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोनाने जगभर थैमान घातलेले असताना मास्क व इतर उपाययोजनासह लसीकरणला एक पर्याय मानला जात आहे. कोरोना लस ही अमृत मानली जात असताना या अमृतरुपी लसीचा एकही थेंब उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने वाया जाऊ दिला नाही हे आकडेवारीतून समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला 1 लाख 49 हजार 810 कोरोना लसीचे डोस आले त्यापैकी 1 लाख 52 हजार 561 नागरिकांना डोस देऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेने 100 पैकी 101.84 टक्के लसीकरण करून मराठवाड्यात पहिला नंबर मिळवला आहे. पुरवठा केलेल्या लस साठा पैकी 2 हजार 751 जणांना अतिरिक्त लस देण्याची किमया प्रशासनाने साधली आहे विशेष म्हणजे लसीकरण मोहीमेत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अनेक लस डोस वाया गेलेले असताना ती तूट भरून काढत 100 टक्के यांचे उदिष्टपूर्ती केली आहे. उस्मानाबाद जिल्हा यंत्रणेचे हे नियोजनबद्ध व कौशल्यपूर्ण दखलपात्र काम राज्याला किंबहुना देशाच्या लसीकरण मोहिमेला एक वेगळी कलाटणी देणारे ठरू शकते. 100 गुणांपैकी 101.84 टक्के गुण घेऊन जिल्हा प्रशासन लसीकरण मोहिमेत पास झाले असले तरी त्यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले असुन याची उत्तरे अपेक्षित आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून लसीकरण मोहिमेला गती येणे गरजेचे आहे मात्र सध्या लस संपल्याने ही मोहीम गेली 2 दिवस बंद आहे. लस पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहीम यापूर्वी 2 वेळेस खंडीत झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1 लाख 49 हजार 810 लसीचे डोस उपलब्ध झाले यातून हेल्थ वर्कर,फ्रंट लाईन वर्कर व 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
एका व्यक्तीला 0.5 एमएल इतकी मात्रा असलेली लस एक वेळेस इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जाते व लसीच्या एका व्हाईल किंवा बॉटलमध्ये 10 डोस असतात. ही लस 2 ते 8 डिग्री तापमानात कोल्ड चैन निर्माण करून साठवुन व वापरावी लागते. एकदा लसीची बॉटल खुली केली की तिचा वापर हा 4 तासात करावा लागतो व त्यानंतर याचा वापर करता येत नाही अश्या केंद्र व राज्य सरकारच्या सामान्य सूचना आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीला जानेवारी महिन्यात लसीकरण बाबत अनेक समज गैरसमज असल्याने लसीकरण मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळला व 10 पैकी 5 ते 6 डोस वापरले जात होते आणि त्यानंतरचे डोस हे खराब होत होते हे चित्र सर्वांनी पाहिले व अनुभवले आहे असे असतानाही 100 टक्के पेक्षा जास्त जणांना लस टोचण्यात प्रशासनाला यश आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लसीकरणच्या सुरुवातीच्या काळात कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचे वाया जाण्याचे प्रमाण हे 6 ते 7 टक्क्यांच्या जवळपास होते मात्र ती तूट कौशल्यपूर्ण नियोजन व आकडेवारीच्या माध्यमातून भरून निघाली आहे. उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागात पर्याप्त सुविधा नसताना ती लस साठवणे, ती लसीकरण केंद्रापर्यंत पोहचवणे, कोल्ड चेन राखणे व लाभार्थीना लस देणे हे काम कौतुकास्पद आहे.
कोरोना संकटात लोकांना सुविधा, उपचार व लसीकरण करून जीव वाचविणे टक्केवारी व आकडेवारी पेक्षा जास्त महत्वाचे आणि प्राधान्याचे आहे.1 मे पासून 18 वर्षाच्या वरील सर्वांना लस दिली जाणार आहे त्यासाठी नोंदणी केली जात आहे मात्र आजच्या स्तिथीत उस्मानाबाद जिल्ह्यात लस उपलब्ध नाही , ती कशी उपलब्ध होईल यावर प्रशासनाने भर देणे आवश्यक आहे
*101 टक्के लसीकरण उदिष्टवर प्रशासनाचे उत्तर -*
लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही डोस वाया गेली हे सत्य असले तरी ते प्रमाण कमी आहे. लसीच्या ज्या बॉटल येतात त्यात कधी कधी 10 डोस ऐवजी 11 तर 12 डोस होतात त्यामुळे 100 टक्के पेक्षा जास्त उदिष्टपूर्ती झाली आहे तसेच 11 ते 12 डोसने सुरुवातीला झालेले लस वेस्टेजचे प्रमाण भरून काढले आहे.
*सरकार व कंपनीला ही बाब प्रशासन कळविणार का ?*
केंद्र व राज्य सरकारने एका लसीच्या बॉटलमध्ये 10 डोस होत असल्याचे अभ्यासअंती जाहीर करून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला पुरवठा केला आहे. किंबहुना लस बनविण्याऱ्या भारत बायोटेक व सिरम इन्स्टिट्यूटनेही एका बॉटलमध्ये 10 डोसचे प्रमाण जाहीर केले आहे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात लसीच्या काही लॉटमध्ये एक बॉटलमध्ये 11 ते 12 डोस होत असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे व तसा त्यांचा अनुभव आहे.हे तथ्य व वस्तुस्थिती असेल तर ही बाब देशाच्या लसीकरण मोहिमेला एक कलाटणी देणारी ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत केंद्र व राज्य सरकार याना माहिती देत कागदोपत्री पत्रव्यवहार केल्यास लस बनविणाऱ्या कंपनीची बॉटल पॅकिंग चूक व सरकारला दिलेली माहिती दुरुस्त होऊ शकते व त्याचे श्रेय उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला मिळू शकते. प्रत्येक बॉटलमध्ये 1 डोस जरी वाढत असले तर देशातला लस पुरवठा व लाभार्थी आकडा वाढणार आहे आणि अनेकांना लसरूपी जीवनदान मिळणार आहे.