‘छमछम’ दारू विक्री, नर्तकींच्या ‘खास बैठका’ – आर्थिक फायद्यामुळे प्रतिष्ठित व्यवसायात, छुपी गुंतवणूक, कलेचा बाजार
धाराशिव – समय सारथी
काही बाबींची त्रुटी असल्याने धाराशिव येथील 2 कला केंद्राचा प्रस्ताव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी फेटाळला आहे. आळणी येथील नटरंग व चंद्राई या 2 कला केंद्रानी परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केला होता मात्र त्यात काही बाबींची त्रुटी असल्याने तो फेटाळला आहे. बाबासाहेब घाटे व अक्षय साळुंके यांनी ‘नटरंग’ तर अरविंद गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील चंद्राई कलाचा प्रस्ताव दिला होता.
धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव, चोराखळी यासह आसपासचा काही भाग कला केंद्राच माहेरघर बनला असुन जुने 6 व नवीन तयार होणारी 6 अश्या जवळपास 10 ते 12 केंद्र इथे प्रस्तावित आहेत. जवळपास सगळ्यांना देवी देवतांची नावे आहेत, लावणी लोककलेच्या नावाखाली डीजे व ‘छमछम’ त्याला जोडधंदा म्हणून दारू विक्री, नर्तकीच्या ‘खास बैठका’ यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने काही धनवान व प्रतिष्ठित मंडळी या व्यवसायात पुर्ण क्षमतेने उतरले आहेत. काही जणांची छुपी गुंतवणूक यात असुन ते लोक समाजापुढे उघड होणे गरजेचे आहेत.
बाबासाहेब घाटे यांच्या ‘पिंजरा’ कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द करीत त्याला सील केले आहे तर अक्षय साळुंके यांच्या महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. साळुंके व घाटे यांनी मिळून आळणी येथे ‘नटरंग’ केंद्र सुरु करण्याचा नवीन प्रस्ताव दिला आहे.
महाकाली केंद्राच्या परवाना बाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असुन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवेळी पोलिसांचा अहवाल व शपथपत्र कोर्टात जिल्हाधिकारी मार्फत सादर केले जाणार आहे अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी दिली. महाकाली केंद्रात 2 गटात वाद झाला त्यातून जीवघेणा हल्ला झाला होता.
महाकाली कला केंद्रातील सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या 3 नर्तकी महिला उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाच्या हत्येत आरोपी असुन पोलिसांनी अटक केली आहे तर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी प्रस्ताव दिला आहे मात्र तो मंजुर केला नाही, असे असतानाही तुळजाभवानी व येडेश्वरी देवीच्या फोटोसह इथे सगळी सजावट करून हे कला केंद्र सज्ज झाले आहे. परवानगीपुर्वी इतकी हिम्मत व ‘विश्वास’ येतो कुठून ? हा प्रश्न आहे.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे ‘रेणुका’ कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे. आळणी येथे ‘प्यासा’ केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.
काही केंद्रात पारंपरिक कला सादर होते मात्र इतरांच्या कृत्याचा फटका त्यांना बसत आहे, सरसकट कारवाई नको नियम पाळू अशी भुमिका काही कला केंद्राची आहे.
5 केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव –
नियमांचा भंग केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तुळजाई व पिंजरा याचा परवाना रद्द केला आहे. नियम मोडणाऱ्यावर गुन्हे नोंद करून 5 कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक खोखर यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे दिला आहे, जो की निर्णयासाठी प्रलंबित आहे. कला केंद्रात नियम पाळावेत, लावणी नृत्य पारंपारिक पद्धतीने सादर करावे, डीजेवर एका बंद खोलीत सादर न करता ती कला मंचावर सादर करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस पोलिसांनी दिली आहे.
त्या नेत्याला पालकमंत्री सरनाईक यांनी सुनावले –
एकीकडे प्रशासन नियमांचा भंग करणाऱ्या कला केंद्रावर कारवाई व ते रद्द करीत असताना दुसरीकडे प्रशासनाने नवीन कला केंद्र यांना मंजुरी द्यावी यासाठी सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. नवीन कला केंद्रसाठी सर्व सेवा सुविधानी युक्त मोठं मोठाले बांधकाम केले आहे, काही ठिकाणी ग्राहकांची विशेष काळजी घेण्यासाठी 25 -30 रूम बांधल्या आहेत, 1 -2 कोटी रुपयात गुंतवणूक केली आहे, त्यांनी आता जगायचं कस ? त्यामुळे जिल्हाधिकारी यांना सांगून परवाने द्या असा ‘बाळ हट्ट’ त्या नेत्याने पालकमंत्री यांच्याकडे केला मात्र पालकमंत्री यांनी सगळे ऐकून घेत स्पष्ट नकार देत फटकारले आहे. स्वतःचे राजकीय वजन वापरून ही भेट घडवून आणणारा तो नेता कोण ? याची चर्चा रंगली आहे.