रेशनच्या गव्हाचा काळाबाजार – कळंब येथील गोदामातील गहू लातूर पोलिसांनी पकडला, मोठी साखळी उघड होणार ?
धाराशिव – समय सारथी
कळंब तालुक्यातील हासेगाव येथील लक्ष्मण लाड या टेम्पो चालकाला लातूर एमआयडीसी पोलिसांनी 2 लाख 70 हजार रुपयांच्या किमतीच्या 105 क्विंटल गव्हासह पकडले आहे. लाड याने सदरील गहू हा कळंब येथील शासकीय धान्य गोदाम येथील असल्याचे पोलिसांना सांगितल्याने मोठी खळबळ उडाली असुन रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. काळाबाजार करणारी साखळी यानिमित्ताने उघड होणार का ? यात कोणाचा सहभाग ? याकडे लक्ष लागले आहे.
लाड हा गहू घेऊन जात असताना त्याला पोलिसांनी पकडले त्यावेळी सदरील गहू हा कळंब येथील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचे लाड याने सांगत हा गहू शासकीय गोदाम येथील असल्याचे तपासात सांगितले. लातूर स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस यांचा तपास करीत असुन त्यांनी कळंब तहसीलदार यांच्याकडे गोदामात असलेल्या गहू या धान्याचे सॅमपल प्रयोगशाळा तपासणीसाठी मागविले आहे. त्यानुसार कळंब तहसील कार्यालयाने ते सॅमपल लातूर पोलिसांना दिले असुन त्याचा रिपोर्ट आल्यावर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे. मात्र लाड याने थेट गहू कुठून आला यांचा जबाबात उलघडा केल्याने त्यात तथ्य असेल तर शासकीय धान्याचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट समोर येऊ शकते.
यापुर्वी कळंब येथील शासकीय गोदामातील करोडो रुपयांचा धान्य घोटाळा राज्यभर गाजला होता त्यामुळे आता लाड याने जबाब दिल्याने कळंब गोदाम पुन्हा चर्चेत आले आहे.