*जिल्हा न्यायाधीश औटी यांची सामाजिक बांधिलकी – 48 निराधारांना आधार*
*कराड तालुका विधी सेवा समितीचा अभिनव उपक्रम , तहसीलदार वाकडे यांची साथ*
कराड – समय सारथी
रस्त्याच्या कडेला, मंदिर – मस्जिद च्या आवारात किंवा बस स्टॅन्ड लगत भिक मागत असणारी व्यक्ती नेहमीच अनेकांच्या द्वेषाचे कारण असते, काही भावनिक लोक एक दोन रुपयांची मदत करून दानत्व साकारतात, बहुतांश जण त्यांना काम धंदा करण्याचा मोकळा सल्ला देतात मात्र कराड तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी अशा निराधार, रंजल्या- गांजल्या लोकांचा सर्वे करून काही भिक्षुकांसह अनेक निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळवून देऊन प्रतिमहा एक हजार रुपयांची हक्काची पेन्शन मंजूर करून दिली आहे, या पवित्र कामी त्यांना कराडचे कार्यकुशल तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मोलाची साथ देत शासन दरबारी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेतल्यामुळे शासनाने तब्बल 48 निराधारांना पेन्शन मंजूर केली आहे. याबाबतचा मंजुरी आदेश नुकताच प्राप्त झाला असून लाभार्थींना त्याबाबतच्या प्रमाणपत्राचे वाटप न्यायाधीश औटी यांनी नुकतेच केले आहे. औटी यांनी उस्मानाबाद येथे कार्यरत असताना अनेक महत्वपूर्ण निकाल जलदगतीने निपटारा करीत दिल्याने त्यांच्या कोर्टात केस म्हणटल्यावर भल्या भक्या गुन्हेगारांची धडकी भरत असे तर अनेक प्रकरणात त्यांनी सामाजिक जबाबदारीचे दर्शन निकालातून घडवून दिल्याने एक कडक शिस्त व संवेदनशील न्यायाधीश असा त्यांचा वेगळा दरारा होता. औटी यांनी त्यांचे हे कार्य अविरत सुरू ठेवले असून 48 निराधारांना आर्थिक आधार दिला आहे.
कराड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश औटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर गत वर्षापासून केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांच्या गरिबीच्या व्याख्ये बाहेरील व समाजाच्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर, उपेक्षित असणारा तृतीयपंथी व वारांगना हा घटक! या घटकास कोरोना सारख्या महामारी च्या काळात अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता होण्याकरता एस. ए. ए. आर. औटी यांनी सर्वकष प्रयत्न केले. परराज्यातील ट्रक चालक व मजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले होते. यावेळी त्यांनी भिक्षुक तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना पोटभर अन्न मिळावे याची विशेष दक्षता घेतली, निराधारांना आधार देण्याचे काम त्यांनी केले मात्र अन्नधान्य पुरवण्याची मर्यादा त्यांच्या लक्षात आल्यानंतर अशा समाजातील आर्थिक दृष्ट्या विकलांग लोकांना त्यांच्या पोटभर अन्नाची कायमस्वरूपी सोय व्हावी याकरता शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली. या कामी त्यांना विधी सेवा समितीचे समन्वयक अनंत लादे, विधी सेवा प्रतिनिधी प्रणव काटू यांचे विशेष सहकार्य लाभले. न्यायाधीश औटी यांनी स्वतः दिव्यांग असताना त्यांच्या सहकार्यांसोबत चारचाकी वाहनातून शहरातून व परिसरातून फेरफटका मारत निराधारांचे अचूक सर्वेक्षण केले, अनेक निराधार यांची माहिती मिळवली. अनेक जणांना स्वतःचे आधार कार्ड नव्हते, रेशनिंग कार्ड नव्हते, यासाठी त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागली.
सुरुवातीला विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत बाबुराव बापू पवार, सिंधुताई बाबुराव पवार, हमिदा सादिक पटेल, शहजाद शमसुद्दीन शेख यांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना यांचा प्रतिमहा एक हजार रुपये लाभ मिळाला. सुरुवातीलाच त्यांच्या कामास ‘ चार चाँद ‘ लागल्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले नाही, पुनश्च एकदा सर्वे चे काम वाढवून जवळपास दीडशे लोकांची यादी बनवली, यामध्ये आज घडीला एकूण 48 लोकांना श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ मिळाला असून लाभार्थींच्या चेहऱ्यावरील भाव अविस्मरणीय होते. कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी न्यायाधीश औटी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाबाबत शासन दरबारी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यास अथक परिश्रम घेतले, यासाठी त्यांना नायब तहसीलदार तांबे, अव्वल कारकून साळुंखे यांनी सहकार्य केले. यामुळे जवळपास 48 निराधारांना आयुष्यभरासाठी चा आधार मिळाला.
*अन अश्रू तरळले….*
दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्याकरता उन्हातान्हात एक – दोन रुपयांची भीक मागणाऱ्या काही भिक्षुकांना यापुढे सरकारकडून हक्काचे एक हजार रुपयांचे प्रत्येक महिन्यास अनुदान मिळणार आहे हे समजताच त्यांचा यावर क्षणभर विश्वासही बसला नाही, मात्र ” सरकारने कोरोना कालावधीत दोन महिन्यांचे आगाऊ निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येकाच्या खात्यात सुरुवातीला दोन हजार रुपये जमा होतील ” असे न्यायाधीश औटी यांनी सांगताच अनेक जणांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. एक जण तर म्हणाला की ” मी आयुष्यात एकरकमी दोन हजार रुपये कधीही पाहिलेली नाही, ते मला मिळणार आहेत यावर माझा विश्वासच बसत नाही, एवढ्या पैशाचे मी काय करू? ” हा त्याचा केविलवाणा प्रश्न पाहून न्यायाधीश औटी यांनाही त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत.