पालकमंत्री प्रतापराव सरनाईक सहकुटुंब साडेसांगवी गावात, फटाके, फराळ, शैक्षणिक साहित्य भेट
धाराशिव – समय सारथी
“आपत्तीने भूमी हादरली,पण माणसाचा आत्मविश्वास डगमगला नाही” या वाक्यात साडेसांगवीकरांच्या जिद्दीचं सार दडलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुराच्या तडाख्यात सापडलेल्या या भूमीत आज पुन्हा आशेचे दिवे पेटले आहेत. गावकऱ्यांशी संवाद साधताना परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी भावना व्यक्त केल्या.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज सायंकाळी भूम तालुक्यातील पूरग्रस्त साडेसांगवी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील हनुमान मंदिरासमोर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा,सून व नातू,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,“मी तुमच्या दु:खात सहभागी आहे आणि साडेसांगवी पुन्हा फुलवणं ही आमची जबाबदारी आहे.”साडेसांगवी हे केवळ एक गाव नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि जनतेच्या आत्मविश्वासाची भूमी आहे.१२५ उंबरठे,६७६ हृदये,आणि ३०० हेक्टर सुपीक जमीन पण पुराच्या पाण्याने या भूमीची शाल फाटून गेली. तब्बल १७३ हेक्टरवरील पिकं वाहून गेली,२८१ शेतकऱ्यांचे सोयाबीन,मूग,उडीद,द्राक्ष आणि केळी पिकं नष्ट झाली.काहींची जमीनच खरडून गेली,तरीही त्यांनी आशेचा दिवा विझू दिला नाही.असे श्री.सरनाईक म्हणाले.
अतिवृष्टीच्या काळात पुरामुळे या गावातील पूल तीन ते चार दिवस पाण्याखाली होता, त्यामुळे ग्रामस्थांना बाहेर कुठेही जाता आले नाही असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरच गावाजवळील नदीवर दोन ठिकाणी पूल आणि अडीच किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येईल.गावाजवळ बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन आजच करून एका वर्षाच्या आतच ही तीनही कामे पूर्ण करण्यात येतील.या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.असे ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते अंगद देवकते,गौतम माने,प्रकाश देवकते,सिद्धेश्वर माने,श्रीकांत डोंबाळे,निर्मल देवकते,सुनील मासळ,तानाजी देवकते,आबासाहेब सलगर,सर्जेराव गायकवाड व नितीन देवकते यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
साडेसांगवी हे 125 उंबरठ्यांची वस्ती असलेले गाव.गावाची लोकसंख्या 676. गावातील बहुतांश जण शेतकरी असून त्यांच्याकडे 300 हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी जवळपास 296 हेक्टर पेरणीयोग्य असून,या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराने 246 हेक्टरपैकी तब्बल 173 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. 281 शेतकऱ्यांची सोयाबीन,मूग, उडीद पिकं नष्ट झाली.द्राक्ष,केळी पिकांचंही नुकसान झाले.गावातील 52 शेतकऱ्यांची 12 हेक्टर शेतजमीन खरडून गेली.
पुराच्या पाण्याने घरात घुसून कपडे,भांडी, वस्तू वाहून गेल्या. शासनाने या 42 कुटुंबांना तातडीने मदत म्हणून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली,सहा घरांची पडझड झाली.दत्तात्रय डोंबाळे यांच्या एका जनावराच्या मृत्यूमुळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले.शासनाने त्यांना 20 हजार रुपयांचे सहाय्य देऊन मदत केली.
या गावात एकूण 1 हजार 59 जनावरे असून 129 म्हशी,874गायी आणि 56 शेळ्या – मेंढ्या आहेत.पाळीव जनावरे ही त्यांच्या शेतीपूरक उपजीविकेची साधन असल्याने या मुक्या प्राण्यांची उपासमार होऊ नये म्हणून गावातील पशुपालकांना 2 ऑक्टोबर रोजी 1 हजार 600 किलो चारा वाटप करून प्रशासनाने गावातील जनावरांच्या पोटासाठी काळजी घेतली.
पालकमंत्री सरनाईक यांनी ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करतांना अंगद देवकते,गौतम माने,प्रकाश देवकते, सिद्धेश्वर माने,श्रीकांत डोंबाळे,निर्मल देवकते,सुनील मासळ,तानाजी देवकते, आबासाहेब सलगर,सर्जेराव गायकवाड व नितीन देवकते यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप केले.
कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी गावाजवळील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व साडेसांगवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.