नियमभंग व गैरप्रकार झाल्यास कारवाई – जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची स्पष्ट भुमिका
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील ‘पिंजरा’ सांस्कृतिक कला केंद्राचा परवाना रद्द केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडुन त्याला सील केले जाणार आहेत. नियमांचा भंग व गुन्हे दाखल असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत 5 कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे पाठवला आहे. नियम व कायदा पाळावे, नियमभंग व गैरप्रकार झाल्यास कोणाचीही गय न करता थेट कारवाई केली जाईल अशी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची स्पष्ट भुमिका आहे.
लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती जपली पाहिजे मात्र कलेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार, नियम भंग खपवून घेतला जाणार नाही. तसे झाल्यास थेट कारवाई करावी असे म्हणत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यासह सर्व लोकप्रतिनिधी हे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. नियमांचे पालन करा बंद खोलीत कला सादर करू नका अन्यथा कारवाई करू अशी नोटीस सर्व कला केंद्राना पोलिसांनी दिली आहे.
कला केंद्र वेळेत बंद करावे, डीजेचा वापर करू नये. एका रूम अथवा बंद खोलीत कला सादर करण्यास कोणतीही परवानगी नाही. स्वतंत्र खोलीत लावणी सादर न करता पारंपरिक कलामंचावर सादर करावी, तिथे मद्य विक्री करू नये यासह कलाकार महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या नियमांचे पालन होणे करावे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिथे नियम पाळले जातील त्यांना अडचण येणार नाही.
पिंजरा कला केंद्राने नियमांचा भंग केला असुन त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी पाठवला होता त्यानुसार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तो रद्द केला. जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही आदेश प्राप्त न झाल्याने कला केंद्र काही काळ सुरु होते. समोरचा दरवाजा बंद तर मागील सुरु असे चित्र होते मात्र आता त्या कला केंद्राला आज मंगळवारी सील केले जाणार आहेत, जेणेकरून ते सुरु राहणार नाही असे खोखर म्हणाल्या.
कला केंद्र असो की इतर कोणतीही ठिकाणी, गैरकृत्य व चुकीची बाब चालणार नाही. असे काही सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर तिथे कारवाई केली जाईल व त्या कलाकेंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येईल. जिल्ह्यात कला केंद्र सुरु असुन त्यातील तुळजाई व पिंजरा या कलाकेंद्राचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला असुन महाकाली केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला आहेत. 5 कला केंद्रानी नियमांचा भंग केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहेत असेही त्या म्हणाल्या.